सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्या सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीची अधिसूचना दोन दिवसांत निघण्याची...
सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्या सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीची अधिसूचना दोन दिवसांत निघण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात दाखल झालेल्या याचिकेचा निकाल लागला आहे. त्यामध्ये जुन्या ठरावांनुसार निवडणूक घेण्याचे आदेशात म्हटले आहेत. याबाबत सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत दोन दिवसांत सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सहकार क्षेत्रातील निवडणुकींचा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीने धुरळा उडणार आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. मे, जून, सप्टेंबर आणि डिसेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यात स्थगिती देण्यात आली.
त्यानंतर जानेवारी महिन्यात राज्य सरकारने ग्रामपंचायत निवडणुका जाहीर केल्या. ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यापाठोपाठ अनेक महिने रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. मात्र, यावर अवघ्या 48 तासांत सरकारने यू टर्न घेत मार्च 2021 पर्यंत पुन्हा स्थगिती दिली. त्यामुळे इच्छुकांची निराशा झाली होती.
कोरोनाच्या साथीच्या कालावधीत ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेता येतात. मात्र, सहकारातील निवडणुका होत नसल्याने महाबळेश्वरमधील एका सभासदाने याचिका दाखल केली होती. निवडणुकीसाठी सभासद न्यायालयात गेल्याने राज्य सरकारला आपली भूमिका बदलावी लागली. याचिका दाखल झाल्यानंतर काही दिवसांत जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरील स्थगिती उठविण्याचे आदेश दिले. मात्र, उच्च न्यायालयाचा निकाल काय लागतो? याकडे सहकार विभागासह निवडणुक प्राधिकरण व इच्छुकांच्या नजरा लागल्या होता.
या याचिकेचा मंगळवारी निकाल जाहीर झाला. याबाबत अधिकृत आदेश आला नसला तरी या निकालाची माहिती स्थानिक पातळीवर आली आहे. या निकालानुसार ज्या टप्प्यावर निवडणुक स्थगित झाली होती. तेथूनच पुढे निवडणुका घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे अखेर 11 महिन्यानंतर सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर पुढील दोन दिवसात सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम लागू शकतो. डीसीसीसह अन्य संस्थांच्या निवडणुकाही यानंतर होणार आहे. थेट उच्च न्यायालयाचा आलेला निर्णय व वर्षभरानंतर सरकारला निवडणुका स्थगित करण्याचा अधिकार नसल्याने या निवडणुका आता पूर्ण होणार आहेत.
ज्या टप्प्यावर निवडणुका स्थगित केल्या होत्या. तेथूनच डीसीसी बँकेची निवडणूक होेणार आहे. उच्च न्यायालयाने याबाबत निकाल दिला आहे. मात्र, त्याची प्रत आपणापर्यंत अध्याप आलेली नाही. याबाबत दोन दिवसांत निवडणूक कार्यक्रम लागण्याची शक्यता असल्याचे सातारचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी सांगितले.