डेहराडून : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील जोशी मठाजवळ हिमकडा कोसळल्यानंतर ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त झाला आहे. या ठिकाणी काम करणारे ज...
डेहराडून : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील जोशी मठाजवळ हिमकडा कोसळल्यानंतर ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त झाला आहे. या ठिकाणी काम करणारे जवळपास दीडशे मजूर दुर्घटनेनंतर बेपत्ता झाले होते. आतापर्यंत दहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, इतरांचा शोध सुरू आहे. तपोवन धरणात अडकलेल्या 16 जणांना सुखरुप बचावण्यात बचाव पथकाला यश आले आहे. घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. बेपत्ता सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तपोवन धरणाजवळ पाण्याच्या प्रवाहात अडकून पडलेल्या 16 जणांना वाचवण्यात आल्याचे आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती उत्तराखंडचे पोलिस महासंचालक अशोक कुमार यांनी दिली. आयटीबीपीच्या जवानांकडून तपोवन सुरुंग उघडण्यासाठी खोदकाम सुरू आहे. मलब्यामुळे या सुरुंगाचा दरवाजा बंद झाला आहे. या मलब्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत तातडीने दुर्घटनाग्रस्त रेणी गावात दाखल झाले आहेत. त्यांनी अधिकार्यांशी चर्चा करत परिस्थितीचा आढावा घेतला. उत्तराखंडच्या जोशीमठाच्या रेणी भागातून हिमनदी कोसळत खाली गेल्यानंतर ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्प जवळपास उद्ध्वस्त झाला आहे. या प्रकल्पाशी संबंधित जवळपास दीडशे जण बेपत्ता आहेत. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेकडून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे.
अलकनंदा ही गंगेची उपनदी आहे आणि गंगा उत्तर प्रदेशात सुमारे एक हजार किलोमीटरचा प्रवास करते. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने जलशक्ती विभागाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भारतीय सैन्य आणि आयटीबीपीचे 600 सैनिक सज्ज आहेत. ऋषिगंगा भागातून बेपत्ता झालेल्या मजुरांचे प्राण वाचवण्यासाठी सर्व बचाव पथके आपले काम चोखपणे करत आहेत. आसामच्या दौर्यावर असणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याशी संपर्क साधला आणि चर्चा केली. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना हरएक प्रकारे मदतीचे आश्वासन दिले. गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तराखंड सरकारला मदत देण्याचे आश्वासन दिले. चमोलीमध्ये हिमकडा कोसळल्यानंतर सुरू झालेला पाण्याचा प्रवाह नंदप्रयागपर्यंत पोहचला. या पाण्याच्या प्रवाहाचा वेग तेथे सामान्य झाला.