पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुका विविध जैवविवधतेने नटलेला आहे. पाटण तालुक्यात विपुल प्रमाणात वनसंपदा असुन काही समाजकंटक गैरसमजुतीतून वणवे लाव...
पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुका विविध जैवविवधतेने नटलेला आहे. पाटण तालुक्यात विपुल प्रमाणात वनसंपदा असुन काही समाजकंटक गैरसमजुतीतून वणवे लावत आहेत. त्यामुळे जंगले जळून खाक होत आहेत. दुर्मिळ वनौषधी वनस्पती नष्ट होत आहेत. सुक्ष्म जीव, पशू, पक्षांचा बळी जात आहे. वणव्यामुळे पशु, पक्षी, प्राण्यांचा अधिवास धोक्यात येत आहे. वणवा लावणार्या व्यक्तीची माहिती वन विभागाला दिल्यास त्यांच्यावर कारवाई करणे वन विभागास शक्य होईल. वणव्यापासून जंगलाचे रक्षण करणे व जंगलांची काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पाटणचे वनक्षेत्रपाल विलास काळे यांनी केले.
न्यू इंग्लिश स्कूल बेलवडे खुर्द विद्यालयात आयोजित वन वणवा विरोधी जनजागृती सप्ताहाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वनपाल एस. बी. भाट, आनंदा जाधव, वनरक्षक वर्षाराणी चौरे, सावंता लोखंडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक अनिल मोहिते म्हणाले, शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे महत्त्व जाणले पाहिजे. अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अन्न साखळीतील प्रत्येक प्राण्याचे आस्तित्व महत्त्वाचे आहे. निसर्ग ही एक खुप मोठी शक्ती आहे. निसर्ग आपणांस भरभरून देत असतो. मानवाकडून मात्र, निसर्गाला विविध प्रकारे ओरबडण्याचे काम सुरू आहे. पशु, पक्षी, प्राणी, वनस्पतींना बाधा येईल, असे कोणतेही कृत्य आपल्या हातून घडू नये. पर्यावरण रक्षण ही सर्वांची जबाबदारी आहे.
यावेळी विद्यार्थ्यांना वन वणवा विरोधी शपथ देण्यात आली. वणवा लावणार्याला वन कायद्यानुसार दोन वर्षे कारावास व पाच हजार दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. वणवा लागल्यास वन विभागास कळवा तसेच तो विझवण्यासाठी सहकार्य करा, असे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले. प्रास्तविक व स्वागत शंकर सुतार यांनी केले. आभार जागृती कासार यांनी मानले.