सातारा / प्रतिनिधी : देशभरातील सिमेंट आणि स्टील उत्पादक कंपन्यांनी मनमानी करत दर वाढवल्याने बांधकाम क्षेत्र अडचणीत आल्याचा आरोप करत येथे बि...
सातारा / प्रतिनिधी : देशभरातील सिमेंट आणि स्टील उत्पादक कंपन्यांनी मनमानी करत दर वाढवल्याने बांधकाम क्षेत्र अडचणीत आल्याचा आरोप करत येथे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या सातारा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. याबाबतचे निवेदन आंदोलकांनी जिल्हाधिकार्यांना दिले असून, यात सिमेंट, स्टील दरवाढीची चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
आंदोलनात सातारा शाखेचे अध्यक्ष श्रीराज दीक्षित, राजेश देशमुख, विजयसिंह जगदाळे, अशोक शिंदे, सचिन देशमुख, संदीप जाधव, ओमकार शिंदे, सागर निंबाळकर, किशोर लोखंडे व इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की देशात उत्पादित होणारे 55 टक्के सिमेंट बांधकाम क्षेत्रासाठी, तर त्यापेक्षाही जास्त लोखंड वापरण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही वस्तूंची भाव वाढ होत आहे. या भाववाढीमुळे बांधकामे पूर्ण करणे व्यावसायिकांना अशक्य झाले आहे. दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या स्वस्तातील घराची संकल्पना अशक्य झाली आहे. कोरोना व इतर कारणांमुळे अडचणीत आलेले बांधकाम क्षेत्र तेजीत येत असताना त्याला दरवाढीचा फटका बसला आहे. त्यामुळे रोजंदारीवरील कामगारांच्या हाताला काम मिळणे दुरापास्त झाले आहे. आगामी काळात बांधकाम व्यवसाय आणखी अडचणीत येऊ नये, यासाठी सरकारने सिमेंट, स्टील नियंत्रण प्राधिकरण निर्माण करण्याची गरज आहे. तसेच दरवाढीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.