राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्या सव्वा वर्षात एका युवतीच्या आत्महत्या प्रकरणामुळे वनमंत्री संजय राठोड यांना राजीन...
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्या सव्वा वर्षात एका युवतीच्या आत्महत्या प्रकरणामुळे वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. सत्तेत आल्यानंतर सरकारमधील एका मंत्र्याला तेही अशा पद्धतीने राजीनामा देण्याची नामुुष्की आली. खरेतर राठोड यांनी मातोश्रीशी संपर्क साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; परंतु राठोड यांना मातोश्रीचे दरवाजे बंद करण्यात आले होते.
पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव भाजप घेत असला, तरी पूजाचे वडील लहानू आणि भावोजी गणेश राठोड यांनी मंत्र्यांना अगोदरच क्लीन चिट दिली आहे. मंत्री राठोड यांनी पूजाला मुलीप्रमाणे सांभाळले असे तिच्या वडीलांनी सांगितले. बंजारा समाजाच्या धर्मगुरूंनी मंत्र्यांची पाठराखण करून, त्यांची बदनामी सहन करणार नाही, असा इशारा दिला आहे. मंत्री राठोड व अरुण राठोड यांच्यातील संवादातील आवाज अरुण यांचा नाही, असे एकीकडे ग्रामस्थ सांगतात. पूजा राहत असलेल्या घरांत मद्याच्या बाटल्या सापडल्या. त्यामुळे ती मद्यपान करीत होती, तसेच दोन जणांसोबत राहत असल्याने तिच्याच चारित्र्यावर संशय घेतला जाऊ लागला. त्यामुळे तिचे वडील लहानू यांनी आता हे सर्व थांबवा, आमचे अर्धे कपडे उतरविले आहेत आणि आणखी कपडे उतरवू नका, असे सांगत तसे झाले, तर आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. पूजाची आत्महत्या नाही, तर ती तोल जाऊन पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी सांगितले आहे. पूजाची आत्महत्या नव्हती, तर तो एक अपघात होता, असे सांगितले जायला लागले आहे. पूजाबाबत जेव्हा ही घटना घडली, तेव्हा तिच्यासोबत असलेल्या दोघांना अटक करून नंतर दोन तासांत सोडून दिल्याने भाजपच्या हातात आयते कोलित मिळाले. समाज मागे, धर्मगुरू पठिराखे झालेले, मुलीचे नातेवाइक क्लिन चीट देत असताना आता अचानक आठ दिवसांनी मंत्री राजीनामा का देतात, असा प्रश्न निर्माण होणे स्वाभावीक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब खान यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले, त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल झाल्या. असे असताना त्या दोघांचे राजीनामे राष्च्रवादी काँग्रेसने घेतले नाहीत. उलट, त्यांची पाठराखण केली. असे असताना पूजाच्या आत्महत्या प्रकरणाने वेगवेगळी वळणे घेतली असताना राठोड यांच्या राजीनाम्यातून मित्रपक्षांना आणि विरोधी पक्षालाही एक वेगळाच संदेश देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका घेतली जाऊ शकते. संजय राठोड यांनी नेमका कोणत्या प्रकरणात राजीनामा दिला हे एव्हाना राज्याला माहिती झाले आहे. मूळची परळीची असलेली 22 वर्षाची पूजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या वर्गमित्रासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात राहत होती. रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या आसपास तिने सोसायटीच्या तिसर्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसर्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पूजाने स्वत:ला संपवल्याचे बोललं जाऊ लागले. पण पूजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असे काही सापडलेले नाही. आता मात्र तिला नैराश्येचे झटके येत होते आणि तिच्यावर दोन वर्षांपासून उपचार चालू होते, अशी माहिती पुढे आली आहे. तिने काढलेल्या 25 लाख रुपयांच्या कर्जामुळे तिने आत्महत्या केली, असा एक अंदाज व्यक्त करण्यात आला होता; परंतु बँकेनेच दिलेलेया स्पष्टीकरणामुळे थकीत कर्जासाठी तिने आत्महत्या केल्याचा संशय ही निकाली निघाला. या प्रकरणात सर्वंच जण काही ना काही लपवण्याचा प्रयत्न करीत आहेत, एवढे नक्की. पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधीत काही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्या त्याच प्रकरणाशी संबंधीत आहेत, का याचे स्पष्टीकरण ना पोलिसांनी दिले ना, पूजाच्या कुटुंबीयांनी; पण त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सूचना देत असल्याचे समजते. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण तापत गेले आणि ते संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर येऊन पोहोचले. या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा म्हणजे पूजाचा मोबाईल आहे. हा मोबाईल लंपास करण्यासाठी मंत्र्यांनी अरुणवर वारंवार दबाव आणल्याचे क्लिपमधून स्पष्ट होते. त्यामुळे अरुणनं पूजाचा मोबाईल लंपास केल्याचे कळते. या मोबाईलमध्ये असंख्य पुरावे असावेत, म्हणूनच हा मोबाईल लंपास केला असावा. हा मोबाईल सापडल्यास अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येतील. त्यामुळे पोलिसांनी हा मोबाईल हस्तगत करण्याची आणि अरुणला अटक करण्याची आवश्यकता आहे; मात्र पोलिस तसे करायला तयार नाहीत. या प्रकरणातील गुंतागुंत वाढत चालली असताना राटोड यांनी राजीनामा दिल्याने आता शिवसेनेवरील टीकेची धार कमी होणार आहे.
राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने त्यातून दोन गोष्टी साध्य झाल्या. त्यातील एक म्हणजे आमच्या मंत्र्यावरच्या कथित आरोपानंतर आम्ही राजीनामा घेऊन त्यांच्या चौकशीत दबाव येणार नाही, याची दक्षता घेतली. दुसरे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनीही सरकारची कोणतीही अडचण होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी आरोप झाले, तर राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जायला हवे, असा संदेश त्यातून दिला गेला. राष्ट्रवादी काँग्रेसवर हा जसा दबावाचा भाग आहे, तसेच भारतीय जनता पक्षाच्या टीकेची दिशा आता शिवसेनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळविण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार का? आता मुख्यमंत्री हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवतील का? या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. संयमी पण कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली. ठाकरे यांनी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन, कडक कारवाई केली. ठाकरे यांनी कारवाई केलेले हे पहिलेच मंत्री ठरले आहेत. महत्त्वाचे म्हणजे संजय राठोड हे महाविकास आघाडीचे मंत्री असले ,तरी ते शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे ठाकरे यांनी स्वत:च्या मंत्र्यावर कारवाई करुन कडक इशारा दिला आहे. राठोड यांचा राजीनामा तर घेतला आहे; मात्र आता संजय राठोड यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का हे पाहावे लागणार आहे. कारण ना राजीनाम्याने, राठोड यांना शिक्षा केल्याने, पूजा परत येऊ शकणार नाही; मात्र कायदा हा सर्वांसाठी समान आहे हे जर पुन्हा एकदा सिद्ध करायचे, असेल तर संबंधित मंत्र्यांवर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी विरोधक करत आहेत, त्यात गैर काहीच नसावे. राठोड यांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेतच दोन गट पडले आहेत. एक गट नैतिकता जपण्यासाठी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशा मताचा आहे. तर दुसरा गट संजय राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई होऊ नये, असे म्हणत आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सगळ्याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.