मुंबई : ग्रेटा थानबर्ग टूल किट प्रकरणातील आरोपी निकिता जेकबला मुंबई उच्च न्यायालयाने २५ हजारांच्या वैयक्तिक बाँडवर तीन आठवड्यांसाठी अंतरिम ज...
मुंबई : ग्रेटा थानबर्ग टूल किट प्रकरणातील आरोपी निकिता जेकबला मुंबई उच्च न्यायालयाने २५ हजारांच्या वैयक्तिक बाँडवर तीन आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तिला तूर्तास दिलासा मिळाला आहे. टूलकिट प्रकरणात दिल्ली न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर तसेच दिल्ली पोलीस अटकेसाठी मुंबईत दाखल झाल्यानंतर निकिताने अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी बंगळुरूतील दिशा रवी या पर्यावरणवादी कार्यकर्तीला रविवारी अटक केली. त्यानंतर अॅड निकिता जेकब आणि बीड येथील शंतनू मुळूक यांच्याविरुद्ध दिल्ली न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर दिल्ली पोलीस अटकेचे प्रयत्न सुरू केले होते. अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आल्यानंतर निकिता जेकब आणि शंतनू मुळूक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शंतनू यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंठपीठात याचिका दाखल केली होती. तर निकिता यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शंतनू यांना काल (१६ फेब्रुवारी) खंठपीठाने अंतरिम जामीन दिला होता. तर निकिता यांच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. आज न्यायालयाने निकिता जेकब यांना तीन आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला. त्याचबरोबर या दरम्यान त्यांना अटक झालीच, तर २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात यावी, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती पी.डी. नाईक यांनी याचिकेवर निर्णय दिला. सुनावणी दरम्यान न्यायालयाने मान्य केले की, निकिताचा कोणताही राजकीय, धार्मिक किंवा आर्थिक अजेंडा नाही. ११ फेब्रुवारीला निकिताच्या घराची झडती घेतली असता काही सामान जप्त केले. संबंधित गुन्हा दुसर्या राज्यात घडला आहे, म्हणून हे प्रकरण त्यांच्या कार्यक्षेत्रात नाही, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.