ठाकरे यांच्या संपत्तीच्या माहितीसाठी कर्जतच्या तहसीलदारांना भेटणार मुंबई/प्रतिनिधी : माजी खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा नील यांची एका जुन...
ठाकरे यांच्या संपत्तीच्या माहितीसाठी कर्जतच्या तहसीलदारांना भेटणार
मुंबई/प्रतिनिधी : माजी खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा नील यांची एका जुन्या वादातून पोलिस चौकशी झाली आहे. त्यानंतर आता किरीट सोमय्या चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात कर्जतमधील जमिनीची अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप करीत आपण कर्जत तहसीलदाराची भेट घेणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे.
सोमय्या म्हणाले, की उद्या मी कर्जत तहसीलदारची भेट घेऊन ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात कर्जत जमिनीच्या अपूर्ण माहितीचा पाठपुरावा करणार आहे. सोमय्या यांचे पूत्र नील सोमय्या यांची एका खंडणी प्रकरणात पोलिस चौकशी करण्यात आली आहे. मुलुंडच्या पोलिस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार नील यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पार पडली. नील हे भाजपचे नगरसेवक आहेत. सध्या ज्या प्रकरणात नील यांची चौकशी झाली, ते प्रकरण बरेच जुने आहे; मात्र काल पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली. या चौकशीनंतर नील घरी परतले. आता पुढील काळात पोलिस नील यांच्यावर पोलिस काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे. किरीट सोमय्या यांनी कथित जमीन खरेदी प्रकरणावरून नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले. ठाकरे कुटुंबीयांनी आतापर्यंत जमिनीचे 40 व्यवहार केले आहेत. त्यापैकी 30 व्यवहार एकट्या अन्वय नाईक यांच्याशी केले आहेत. नाईक यांच्यासोबत एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार करण्याचे कारण काय? मुख्यमंत्र्यांचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे का?, अशी प्रश्नांची सरबत्तीच सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर केली होती. ठाकरे कुटुंब आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांचे आर्थिक संबंध काय आहेत? असा सवाल सोमय्या यांनी केला. एका व्यक्तीशी जमिनीचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार कसे काय झाले? असेही त्यांनी विचारले. अजमेरा बिल्डर्सनी दोन कोटी 55 लाखांना विकत घेतलेली जमीन आता मुंबई महानगरपालिका विकत घेणार आहे; मात्र मुंबई महागनरपालिकेला या जमिनीसाठी 900 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. या व्यवहारासाठीचे 300 कोटी रुपये अजमेरा बिल्डर्सला देण्यात आले आहेत. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. आता संजय राऊत आणि शिवसेनेच्या प्रवक्त्यांमध्ये हिंमत असेल तर या आरोपांवर बोलावे, असे आव्हान किरीट सोमय्या दिले होते.