सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरासह जिल्ह्यात बुधवारी रात्री व गुरुवारी दुपारनंतर सुरु झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारीसह आंबा ...
सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरासह जिल्ह्यात बुधवारी रात्री व गुरुवारी दुपारनंतर सुरु झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारीसह आंबा पिकाच्या मोहर झडून शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे दुष्काळी तालुक्यातीलही पिकांच्या नुकसान होत आहे.
बुधवारी रात्री वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे डिस्कळ, बुध परिसरातील गहू, ज्वारीची पिके ठिक ठिकाणी भुईसपाट झाली आहेत. तर गुरुवारी दुपारपासून वादळी वार्यासह सुरु झालेल्या पावसामुळे गहू, हरभरा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सर्वत्र आज सकाळपासून ढगाळ हवामान झाले होते. ठिकठिकाणी अवकाळी पावसाची रिमझिम सुरु झाल्यामुळे शेतकर्यांची धांदल उडाली होती.
सद्यःस्थितीत, मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण होत असल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके अवकाळी पावसामुळे वाया जातील. या भीतीमुळे धास्तावलेल्या शेतकर्यांची तारांबळ उडत आहे. काही ठिकाणी हरभरा, ज्वारीची पिके काढून ठेवली आहेत. ती या अवकाळीत सापडू नये, यासाठी मळून धान्य घरी आणण्याची शेतकर्यांची गडबड सुरू झाली आहे. परिणामी वेगवेगळ्या संकटातून सावरताना शेतकर्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.