कराड / प्रतिनिधी : येथील नगर परिषदेच्या नगरपालिका वाचनालयात सुरु असलेल्या स्पर्धा परीक्षासाठीच्या अभ्यासिकेतून नुकतेच नऊ विद्यार्थ्यांनी सुय...
कराड / प्रतिनिधी : येथील नगर परिषदेच्या नगरपालिका वाचनालयात सुरु असलेल्या स्पर्धा परीक्षासाठीच्या अभ्यासिकेतून नुकतेच नऊ विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, गटनेते राजेंद्रसिंह यादव, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, नगरसेवक विनायक पावसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ओंकार मुळे, महेश कांबळे, निशांत ढेकळे, जयंत बेडेकर, शिवराज इंगवले, ग्रंथालयाचे ग्रंथपाल संजय शिंदे,अभियंता ए. आर. पवार आदी उपस्थित होत.
नगरपालिकेचे नगर वाचनालय यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात सुरू असून या ठिकाणी 2012 साली स्पर्धा परीक्षेसाठी स्वतंत्र अभ्यासिका सुरू करण्यात आली. नगर वाचनालयात 72 हजार पुस्तके उपलब्ध असून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यासिका असून त्यासाठी चार हजार पुस्तके उपलब्ध आहेत. अभ्यासिका सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी खुली असते.सध्या या अभ्यासिकेत 80 विद्यार्थी अभ्यासिकेचा लाभ घेत आहेत.
नगर वाचनालयाच्या या अभ्यासिकेचा सर्वसामान्य कुटुंबातील शेकडो गरीब, होतकरू मुलं-मुली लाभ घेत आहेत. नगरपालिकेने सामाजिक बांधिलकेतून सुरू केलेल्या या उपक्रमाचा लाभ घेऊन गेल्या आठ वर्षात सर्वसामान्य कुटुंबातील 95 विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळवून शासन सेवेत दाखल होण्याचा मान मिळवला आहे.स्पर्धा परीक्षेतून नुकतीच निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अक्षय संजय कदम पिंपरी (सीआयएसएफ), प्रतीक भानुदास केंजळे साखरवाडी (सीआरपीएफ), अमर संजय पाटोळे (एसएसबी), अक्षय नारायण शेडगे हणबरवाडी (बीएसएफ), प्रशांत प्रकाश जगदाळे मसूर (आसाम रायफल), अक्षय विजय साळुंखे किवळ, अक्षय आनंदा घोरपडे विंग, ओंकार तानाजी हजारे कासारशिरंबे(सीआयएसएफ), किशोर शहाजी कांबळे मसूर (आसाम रायफल) मध्ये निवड झाली आहे. यानिमित्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.