पुणे/प्रतिनिधीः राज्यात मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनातून काहीही साध्य होणार नाही. ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याने आंदोलन करण्यापेक्...
पुणे/प्रतिनिधीः राज्यात मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनातून काहीही साध्य होणार नाही. ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याने आंदोलन करण्यापेक्षा सरकारने न्यायालयात कशी बाजू मांडावी, यासाठी प्रयत्न करायला हवे, आंदोलनातून कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका होण्यापेक्षा आंदोलनातून माघार घ्यावी,अशी विनंती खासदार संभाजीराजे यांनी केली.
राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत, हा विषय न्यायप्रविष्ठ आहे, पाच फेब्रुवारीला मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय होते, हे पाहणे महत्वाचे आहे. पाच तारखेपर्यंत वाट पाहणे आवश्यक आहे, असे सांगून ते म्हणाले, की औरंगाबादला मी जाणार होतो; मात्र काही कारणामुळे जाता आले नाही...आंदोलन मागे घेतले नसेल तर मागे घ्यावे अशी मी विनंती करतो. सातार्यातील एका कार्यक्रमात छत्रपती संभाजीराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले एकत्र आले होते, तिन्ही राजे एकत्र येणार का हा प्रश्न विचारला असता, आम्ही तीनही राजे एकत्रच आहोत, सगळ्यांची भूमिका एक आहे, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, सातारा आणि कोल्हापूर या गाद्या वेगळ्या नाहीत आम्ही एकत्रच आहोत, एकत्र येण्याचा प्रश्नच नाही असे म्हणत त्यांनी विषयाला बगल दिली. कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव द्याव ही आमची मागणी आहे, यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहोत, असे सांगून ते म्हणाले, की औरंगाबाद विमानतळाचा नामांतराचा विषय हा नेमका राजकारणाचा विषय आहे का काय कळत नाही; मात्र औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करायला काय हरकत आहे, असे म्हणत नामांतराला संभाजीराजे यांनी पाठिंबा दर्शवला. दिल्लीत जे शेतकरी आंदोलन चालले आहे. त्याची इतर कोणत्या गोष्टींशी तूलना करणं चूकीचं आहे, शेतकर्याला त्रास होणार याची खबरदारी ही सत्ताधारी सरकारने घ्यायला हवी, असे म्हणत मोदी सरकारला त्यांनी टोला लगावला राज्यात जो विजबीलाचा प्रश्न उपस्थित झाला आहे, त्याबाबत सरकारने योग्य ती भूमिका घ्यावी, असा सल्ला संभाजीराजे यांनी दिला.