पुणे/प्रतिनिधीः पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेमधील शरजील उस्मानीच्या भाषणावरून वाद पेटला आहे. त्याच्याविरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहेत; ...
पुणे/प्रतिनिधीः पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेमधील शरजील उस्मानीच्या भाषणावरून वाद पेटला आहे. त्याच्याविरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहेत; परंतु शरजीलच्या विधानाचा भाजप आणि संघाने विपर्यास केला आहे, असे म्हणत एल्गार परिषदेने शरजीलच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच शरजीलचे संपूर्ण भाषणही प्रसिद्ध केले आहे.
शरजीलवर लावण्यात आलेले देशद्रोहाचे आरोप चुकीचे आहे. एल्गार परिषदेचे आयोजक म्हणून आम्ही ठामपणे पाठीशी उभे आहोत असे एल्गार परिषदेने म्हटले आहे. शरजील उस्मानी एक 23 वर्षाचा मुस्लिम तरुण. मुस्लिम यासाठी नमूद करावे लागते आहे, त्याचे कारण फक्त आणि फक्त त्याच्या धर्मामुळे आज त्याला इतके विकृत, हिंसक आणि द्वेषपूर्ण लक्ष्य केले जात आहे, असा आरोपही एल्गार परिषदेच्या आयोजकांनी केला आहे. शरजील हा उत्तर प्रदेशातील अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्याथी आणिण स्वातंत्र्य शोध-अभ्यासक आहे. तो ’फ्रॅटर्निटी मूव्हमेंट’चा राष्ट्रीय सचिव आहे. एनआरसी, सीएए, एनपीआर विरोधातील आंदोलनात शरजील उस्मानीचा सक्रिय सहभागी होता, असे एल्गार परिषदेने म्हटले आहे. दरम्यान, वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एल्गार परिषदेवर टीका केली. एल्गार परिषदेला मी महत्व देत नाही. अगोदरच्या एल्गार परिषदेच्या हेतू वेगळा होता’ अशी टीका अॅड. आंबेडकर यांनी केली.