कर्जत / प्रतिनिधी: मतदारसंघ कॅन्सरमुक्त करण्याचा निर्धार आमदार रोहित पवार यांनी केला असून आरोग्यसेवेपासून एकही गरजू वंचित राहणार नाही. आता...
कर्जत / प्रतिनिधी: मतदारसंघ कॅन्सरमुक्त करण्याचा निर्धार आमदार रोहित पवार यांनी केला असून आरोग्यसेवेपासून एकही गरजू वंचित राहणार नाही. आता या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून घरपोहोच सुविधा उपलब्ध झाली असून तिचा लाभ घ्यावा, असे आवाहन अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टीच्या विश्वस्त तथा कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालक सुनंदा पवार यांनी केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, एचडीएफसी बँकेच्या सहकार्यातून व आमदार रोहित पवार आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या माध्यमातून मोबाइल क्लिनिक व्हॅन (फिरता दवाखाना) चे हस्तांतरण व लोकार्पण श्रीमती पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या पवार म्हणाल्या, की उपजिल्हा रुग्णालयात ईसीजी आणि एक्स रे सुविधा उपलब्ध झाली असून ग्रामीणसह शहरी भागातील रुग्णांसाठी हा फिरता दवाखाना मोठी उपलब्धता आहे. चांगल्या आरोग्यासाठी व्याधींकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच उपचार केल्यास अनर्थ टळतो. दळणवळण सुविधा अभावी मुलींचे शिक्षण थांबते. पर्यायाने अल्पवयीन लग्नाचे प्रमाण वाढते. यामुळेच आगामी काही दिवसात येथील आगाराचे भूमिपूजन होणार आहे. शहरासह तालुक्याचे आरोग्य सुधारावे, यासाठी अनेक जण सरसावले आहेत; मात्र नागरिकांत अजून आपलेपणाची भावना नाही. या लोक चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे. प्रास्ताविक डॉ. नितीन पिसाळ यांनी केले. डॉ. सुचेता यादव यांनी आभार मानले.