$type=ticker$snippet=hide$cate=0

मातोश्रीच्या बंद दाराआडच्या चर्चेचं गुर्‍हाळ

राजकारणात कोणी कुणाचा कायमचा मित्र नसतो, तसंच कुणाचा कायमचा शत्रूही नसतो. राजकीय पक्षांचंही तसंच असतं. राजकीय फायद्यासाठी तत्वं, मैत्रीची बं...


राजकारणात कोणी कुणाचा कायमचा मित्र नसतो, तसंच कुणाचा कायमचा शत्रूही नसतो. राजकीय पक्षांचंही तसंच असतं. राजकीय फायद्यासाठी तत्वं, मैत्रीची बंधनं गळून पडतात. सत्तेच्या हव्यासापोटी दिल्या, घेतल्या वचनांची आठवण राहत नाही. एकेकाळच्या मित्राला मग सगळी दूषणं दिली जातात. तापी नदीत बुडवलेल्या तत्वांचा संदर्भ दिला जातो; परंतु झेलमच्या पाण्यात बुडवलेल्या तत्त्वाचं काय केलं, हे कुणीच का सांगत नाही. भारतीय जनता पक्षाचे देशातील सर्वांत जुने मित्र म्हणून शिवसेना आणि अकाली दलाकडं पाहिलं जायचं. आता हे दोन्ही मित्रपक्ष भाजपच्या बरोबर नाहीत. 

भाजपच्या यशाचे पायाचे दगड झालेले मित्रपक्ष दूर करून भाजपला आता काही नुकसान झालं असं वाटत नसेल; परंतु दीर्घकाळाचा विचार करता अडचणीच्या काळात भाजपकडं मैत्रीचा हात पुढं करायला कुणीच तयार होणार नाही. शिवसेना आणि भाजप हे सर्वांत जुने मित्रपक्ष असले आणि त्यांच्यात हिंदुत्व हा दोघांना बांधून ठेवणारा समान दुवा असल्याचं सांगितले जात असलं, तरी प्रत्यक्षात हा धागा मजबूत नव्हता. तो तडजोडीच्या आणि वाटाघाटीच्या तत्त्वावर अभेद्य होता. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पालघरच्या जागेसह नाणार प्रकल्प रद्द करण्याच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती कायम राहिली खरी; परंतु त्याचवेळी या युतीचा पाया ठिसूळ होता, हे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीला दोन्ही पक्षांनी जागावाटपावरून ताणून धरलं होतं. जागा वाटप करताना मुख्यमंत्रिपद व मंत्रिपदं समान घेण्याचं ठरलं होतं, असं सांगितलं जात होतं. त्या वेळी शिवसेना वारंवार तसं सांगत होती. माध्यमातून बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. पहिले अडीच वर्षे कुणाला मुख्यमंत्रिपद मिळणार, याच्या अटकळी बांधल्या जाणार्‍या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावर त्या वेळी या मित्रापैकी कुणीही काही बोलत नव्हतं. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला 105 जागा मिळाल्या, त्यांनंतर काही अपक्ष आमदारांना भाजपनं, तर काही अपक्षांना शिवसेनेनं गळाला लावलं. खरंतर दोन्ही पक्षांकडं पुरेसं बहुमत होतं. या दोन पक्षांनी सत्ता घेतली असती, तर त्यात कुणालाही आक्षेप नव्हता; परंतु मुख्यमंत्रिपद हेच त्यांच्या सत्तेतला मुख्य अडथळा होता. निवडणुकीच्या प्रचारात भाजप सातत्यानं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवीत असल्याचं सांगत होता आणि शिवसेना सातत्यानं आमचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं सांगत होती. त्या वेळी हे दोनही पक्ष एकमेकावर आक्षेप घेत नव्हते. मातोश्रीवर बंद खोलीत चर्चा झाल्याचे सांगितलं जात होतं; परंतु बंद खोलीत काय चर्चा झाली, हे कुणीच सांगत नव्हतं. त्यामुळं दोन्ही पक्षांचे कार्यकर्तेही संभ्रमात होते. विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपद द्यायला भाजप तयार नसल्यानं शिवसेनेनं मग भाजपला सहकार्य करण्यास नकार दिला. सत्तेसाठी आवश्यक बहुमत कुणाकडंच नव्हतं. त्यामुळं मग एक महिनाभर सत्तेसाठी वेगवेगळी समीकरणं आकाराला येऊ पाहत होती. केंद्र सरकारनं राष्ट्रपती राजवट लावली आणि घोडेबाजार होण्याची शक्यता निर्माण झाली; परंतु भाजपविरोध या एकमेव सूत्रानं शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्र आले. त्यानंतर भाजपनं मातोश्रीच्या बंद खोलीत अशी काहीच चर्चा झाल्याचं नाकारलं. उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या तिघांत ही चर्चा झाली होती. त्यातील फडणवीस यांनी अगोदर अशी काही चर्चा झाल्याचं नाकारलं असलं, तरी शिवसेना मात्र सातत्यानं शाह यांच्या हवाल्यानिशी अशी तडजोड झाल्याचं सांगत होतं. गेल्या सव्वा वर्षांत शाह यांनी कधीही त्यावर मतप्रदर्शन केलं नाही आणि आताच का केलं, हे समजावून घेण्यासाठी काही दिवसांतील घडामोडी पाहाव्या लागतील. विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर झालेल्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनातील शेवटचं भाषण करताना फडणवीस यांनी मी पुन्हा येईन, असं जाहीर केलं होतं, याचा अर्थ त्यांचं सरकार आणि तेच मुख्यमंत्री असा होत होता. सर्वाधिक जागा मिळूनही भाजपला राज्यातील सत्तेपासून दूर राहावं लागलं. वारंवार लोटस् ऑपरेशनचा प्रयत्न करूनही भाजपच्या हाती काहीच लागलं नाही, तरीही भाजपनं आपले प्रयत्न सोडले नाहीत. विधान परिषदेच्या निवडणुकीत अपयश, ग्रामपंचायत निवडणुकीत जास्त जागा मिळाल्या असल्या, तरी पूर्वीच्या तुलनेत आलेलं अपयश यामुळं भाजपत अस्वस्थता होती. त्यातच एकनाथ खडसे यांच्यासह काही माजी आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेत प्रवेश केला. काहींची अजूनही रीघ चालूच आहे. असं असताना गेल्या आठवड्यात विरारमध्ये बोलताना फडणवीस यांनी मी पुन्हा येईन, असं सांगितलं. त्याचवेळी सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यांशी बंद दाराआड चर्चा केली. शिवसेना हा कायमचा शत्रू नाही, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं. त्यामुळं शिवसेना-भाजपच्या मैत्रीच्या तारा जुळतात, की काय अशा शंका काहींना यायला लागल्या होत्या; परंतु तसं होणार नव्हतं. त्याचं कारण सरकारपुढं गेल्या वर्षभरात भाजपनं काही थोड्या अडचणी उभ्या केल्या नाहीत. त्याला ठाकरे आणि खा. संजय राऊत यांनी तितक्याच चोखपणे प्रत्युत्तर दिलं. दसरा मेळावा असो, की अन्य; भाजपची पिसं काढण्याचं काम केलं. ही पार्श्‍वभूमी एकदा लक्षात घेतलं, की दोन्ही पक्षांत किती कटुता आली आहे, हे लक्षात येतं. कारशेडचा प्रश्‍न असो, की अन्य; भाजपनं केंद्रीय सत्तेचा उपयोग करून शिवसेनेला अडचणीत आणलं. ठाकरे यांचे जमिनीचे व्यवहार, शिवसेनेच्या आमदारांची ईडी चौकशी, खा. राऊत यांच्या पत्नीला ईडीनं बजावलेली नोटीस हे सर्व शुद्ध हेतूनं होत नव्हतं. या पार्श्‍वभूमीवर शाह यांनी ओरोस येथे केलेलं भाषण दोन पक्षांत आणखी दुरावा निर्माण करणारं आहे. शिवसेना म्हणते, की बंद खोलीत वचन दिलं होतं. आम्ही दिलेलं वचन मोडणारे लोक नाही. मी बंद दरवाजामागं राजकारण करत नाही. जे करतो ते जाहीरपणे, हे शाह  यांचं म्हणणं शिवसेनेला चांगलंच झोंबलं आहे. त्यातच बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही, बाळासाहेबांची तत्व शिवसेनेनं तापी नदीत बुडवून टाकली. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली  आहे, अशी टीका शाह यांनी केली. त्यामुळं या दोन मित्रांत आणखी अंतर वाढलं आहे. सत्तेच्या मोहापायी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे सिद्धांत विसरली, असं म्हणत शाह यांनी शिवसेनेला डिवचलं. शिवसेना नेत्यांना शाह यांचे शब्द जिव्हारी लागले आणि त्यांनी शाह यांना प्रत्युत्तर दिलं. शाह यांनी मुख्यमंत्रिपदाचा विषय उकरून काढल्यानं शिवसेना-भाजपत पुन्हा शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. त्यामुळंच एकेकाळी राजकारणात एकमेकांचे सोबती असलेल्या या दोन्ही पक्षांचा काडीमोड झाला आहे का, या प्रश्‍नाचं उत्तर तितकसं सोपं नाही. सत्तेसाठी खोटं बोलण्याची आमच्यामध्ये लाचारी नाही. 105 आमदार, देशाची प्रचंड आर्थिक यंत्रणा, तपासयंत्रणा हाती असतानाही महाराष्ट्रात सत्ता मिळाली नाही, ही त्यांची वेदना मी समजू शकतो,’ असं म्हणत राऊत यांनी भाजपच्या वर्मावर बोट ठेवलं. मी त्यांच्या दुखात सहभागी आहे, ठाकरे मुख्यमंत्री आहेत. हे वास्तव त्यांनी स्वीकारायला हवं, असं राऊत म्हणाले. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावरून शाह आणि शिवसेना नेत्यांची वक्तव्य म्हणजे या दोन पक्षांमध्ये पुन्हा एकत्र येण्याचं सर्व मार्ग बंद झाले का, या प्रश्‍नाचं उत्तर तात्पुरते असं देता येईल. सद्य स्थितीत शिवसेना महाविकास आघाडी सोबत राहील; पण येणार्‍या काळात काय होईल हे परिस्थितीवर अवलंबून असेल. भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झालेत. जीएसटी प्रणाली चुकली असली तर पंतप्रधानांची चूक मान्य करावी, असं थेट विधान ठाकरे यांनी केलं. भाजप नेत्यांवर टीका करण्यात ठाकरे मागेपुढे पाहत नाहीत. त्यानंतर, शिवसेना-भाजप पुन्हा कधीच एकत्र येणार नाहीत अशी चर्चा सुरू झाली होती; परंतु राजकारणात फक्त इंटरेस्ट कायम असतो. मित्र-शत्रू नाही. 2013 साली नितीशकुमार राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले; मात्र त्यानंतर त्यांनी भाजपचा हात धरला. उत्तर प्रदेशात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले मायावती आणि अखिलेख यादव सत्तेसाठी एकत्र आलेच होते. ही उदाहरणं विसरून चालणार नाही. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस् मोहिमेला अजून यश आलेलं नाही, तरी भाजपनं त्याचा नाद सोडलेला नाही. काँग्रेसच्या काळात नारायण राणे यांना जे मिळालं नाही, ते भाजपच्या काळात मिळालं. राणे अन्य पक्षांपेक्षा शिवसेनेवर त्यातही उद्धव ठाकरे यांच्यावर ज्या पद्धतीनं टीक करतात, ते पाहिलं, तर राणे यांच्यामागं भाजपनं ताकद उभी करण्यामुळंही शिवसेना आणि भाजपत आणखी दुरावा निर्माण होईल.



Name

] ब्रेकिंग,858,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,3,Latest News,5741,letest News,597,Loksabha-2019,164,Maharashtra,190,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,31,satara,128,satara.,2,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10277,औरंगाबाद,363,क्रीडा,678,दखल,700,देश,4420,नाशिक,802,पुणे,726,बीड,1435,बुलडाणा,23,बुलढाणा,876,ब्रेकिंग,16306,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13529,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3667,विदेश,650,संपादकीय,1540,सातारा,3197,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मातोश्रीच्या बंद दाराआडच्या चर्चेचं गुर्‍हाळ
मातोश्रीच्या बंद दाराआडच्या चर्चेचं गुर्‍हाळ
https://1.bp.blogspot.com/-QRAi186zR7c/YCKeXtS3ecI/AAAAAAABoEQ/xVbdFKZh5QcqHTlQ2iHzbmZYnwT-lYvOACLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-QRAi186zR7c/YCKeXtS3ecI/AAAAAAABoEQ/xVbdFKZh5QcqHTlQ2iHzbmZYnwT-lYvOACLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_382.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_382.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content