पुणे/प्रतिनिधी: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या तपासाचा अहवाल पुणे पोलिसांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे सोपवला आहे. या अहवालाची प्रत ...
पुणे/प्रतिनिधी: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या तपासाचा अहवाल पुणे पोलिसांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे सोपवला आहे. या अहवालाची प्रत राष्ट्रीय महिला आयोगावाही देण्यात आली आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात काही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या. या रेकॉर्डिंगमधील आवाज हा संजय राठोड यांचाच आहे, असा दावा भाजपने केलेला आहे. त्यामुळे पूजाच्या आत्महत्या प्रकरणात निष्षक्ष चौकशी करुन राठोड यांची हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपने लावून धरलेली आहे.
भाजप नेते चित्रा वाघ, अतुल भातखळकर या नेत्यांनी महाविकास आघाडीचे सरकार आणि पोलिसांना थेट लक्ष्य करत, राठोड यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. पोलिस या प्रकरणी निष्पक्षपणे तपास करत नसल्याचेही भाजपने म्हटले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एक अहवाल सादर केला आहे. अहवालाच्या प्रति राज्याचे पोलीस महासंचलक तसेच राष्ट्रीय महिला आयोगाला पाठवण्यात आल्या आहेत; मात्र असे असले तरी या प्रकरणात अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नसल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा पुणे पोलिस तपास करत आहे. पोलिसांनी पूजाच्या घराची तपासणी केली असता तिच्या घरात मद्याच्या चार बाटल्या सापडल्या. त्यातील अडीच बाटल्या रिकाम्या होत्या. त्यावरून घरातील व्यक्तींनी मद्य प्राशन केल्याचा पोलिसांना संशय आहे; मात्र पूजाने मद्य प्राशन केले होते की नाही या बाबतचा अद्याप उलगडा झालेला नाही. दरम्यान, या प्रकरणात पोलिस निष्पक्षपणे तपास करत नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत असला तरी, राज्यात एकूण तीन पथकांकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तपास सुरू आहे. ही तिन्ही पथके राज्यातल्या वेगवेगळ्या भागात तपास करत आहेत.