मुंबई/प्रतिनिधी : मागील कित्येक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. राज्याच्या राजकारणात ज्याप्रमाणे मुंबईचं अनन्यसाधार...
मुंबई/प्रतिनिधी : मागील कित्येक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. राज्याच्या राजकारणात ज्याप्रमाणे मुंबईचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्याचप्रमाणे राजकीय वर्तुळात अमुक एका पक्षासाठी या मायानगरीतील प्रशासनावर असणारे वर्चस्व अतिशय मोलाचे असते. त्यामुळे येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने आतापासूनच शिवसेनेने तयारी सुरू केली आहे.
’मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा.’ नंतर आता शिवसेनेनं गुजराती बांधवांसाठी
’रासगरबा’ आयोजित केला आहे. हा कार्यक्रम अधिक खास ठरत आहे, कारण यामध्ये 21 उद्योजक आणि व्यावसायिक शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांनी गुजराती बांधवांसाठी हा कार्यक्रम येत्या सात फेब्रवारी रोजी मालाडमध्ये आयोजित केला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीला आता अवघ्या एक वर्षाचा अवधी उरला आहे. त्यामुळे शिवसेनेने आता भाजपची व्होटबँक असलेल्या गुजरातीबहुल विभागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू करत राजकीय पटलावर असणारे वर्चस्व आणखी बळकट करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. 2022 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी आतापासून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्ष बांधणीपासून पक्ष बळकटीपर्यंतची पावले आता उचलली जात आहेत. त्यामध्येच मुंबई महानगरपालिकेच्या तब्बल 227 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये गुजराती मतदारांचीही महत्त्वाची भूमिका असेल. याच पार्श्वभूमीवर 50हून अधिक गुजराती बहुल भागात शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.