आरोग्य सेवा व दूध वितरण सुरू राहणार गोंदवले / वार्ताहर ः दहिवडी येथील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता शनिवार, दि. 20 ते सोमवार, दि....
आरोग्य सेवा व दूध वितरण सुरू राहणार
गोंदवले / वार्ताहर ः दहिवडी येथील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता शनिवार, दि. 20 ते सोमवार, दि. 22, असे तीन दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हॉस्पिटल, मेडिकल व दूध वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. बंद असल्याने कोणीही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दहिवडी नगरपंचायत व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपंचायतीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष धनाजी जाधव, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार, वैद्यकीय अधिकारी डॉ. कोडलकर, डॉ. हेमंत जगदाळे, नगरसेवक, व्यापारी, आशा, अंगणवाडी सेविका व सामाजिक कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते. सोमवारी बाजार होणार नाही. सर्व प्रकारची दुकाने बंद राहणार आहेत. हॉस्पिटल, मेडिकल व दूध सेवा सुरू राहणार आहे. याची नोंद सर्वांनी घ्यावी, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे.
या तीन दिवसात आशा व अंगणवाडीच्या सेविका घरोघरी जाऊन कोरोनाबाबत सर्व्हे करणार आहेत. प्रत्येक व्यापार्याने कोरोनाची तपासणी करून घ्यायची आहे. दहिवडी येथे सध्या 65 रुग्ण आहेत. अजून टेस्ट सुरूच आहेत. दररोज रुग्ण वाढतच आहेत. खबरदारी म्हणून दहिवडीमध्ये मास्कशिवाय कोणी फिरू नये. आढळल्यास 500 रुपये दंड करण्यात येईल. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये व विनाकारण कोठेही गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले.