अहमदनगर/प्रतिनिधी: शहरात येणार्या मंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कमानी उभारून आणि पोस्टर लावून स्वागत केले...
अहमदनगर/प्रतिनिधी: शहरात येणार्या मंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कमानी उभारून आणि पोस्टर लावून स्वागत केले जाते; मात्र नगरमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांच्या स्वागतासाठी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच भगवी कमान उभारण्यात आली आहे. माजी महापौर आणि त्यांच्या पतीचे फोटो असलेले पोस्टर लावून शहर शिवसेनेतर्फे मंत्र्यांचे स्वागत करण्यात येत असल्याचा उल्लेख त्यावर आहे. मुख्य म्हणजे मंत्र्यांचा हा दौरा राजकीय नसून पूर्णपणे सरकारी आहे.
राज्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आज नगरला येणार होते; मात्र त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आसून ते आता उद्या (शुक्रवारी) येणार आहेत. नगरविकास विभागाशी संबंधित महापालिका आणि नगरपालिकांमार्फत राबविण्यात येणार्या योजनांचा आढावा घेण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेणार आहेत. त्यांचा हा संपूर्ण कार्यक्रम सरकारी असून या व्यतिरिक्त कोणताही खासगी अगर राजकीय कार्यक्रम त्यांनी घेतलेला नाही. मुख्य म्हणजे पूर्वी एकदा त्यांचा ठरलेला दौरा अचानक रद्द झाला, तर या वेळीही तो पुढे ढकलण्यात आला.
शिंदे यांच्या स्वागतासाठी शिवसेनेतर्फे थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कमान उभारण्यात आली आहे. त्यावर शिंदे यांचे मोठे फोटो लावण्यात आले आहेत. बाजूला एक पोस्टर लावण्यात आले असून त्यावर माजी महापौर आणि त्यांच्या पतीचे फोटो आहेत. शहर शिवसेनेतर्फे हे स्वागत करण्यात येत असल्याचा त्यावर उल्लेख आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर अशी कमान उभारण्याची परवानगी शिवसेनेला कोणी दिली? परवानगी नसेल तर अशी कमान कशी उभारू देण्यात आली, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. जिल्हाधिकारी कार्यलयासमोर दोन वर्षांपासून उपोषणाचे मंडप आणि फलक लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणार्यांनाही वेगळी जागा ठरवून देण्यात आली आहे. अशा पद्धतीने प्रतिबंधित क्षेत्र ठरत असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरच पक्षीय जाहिरात करण्यास अधिकार्यांनी कशी परवानगी दिली, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मंत्री आज येणार म्हणून रात्रीच ही कमान उभारण्यात आली आहे. दुपारपर्यंत तरी कोणीही ती काढण्यास सांगितलेले नाही, यावरून अधिकार्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. आता दौरा उद्या होणार असल्याने आज आणि उद्या अशी दोन दिवस ती कमान तेथे राहू शकते. शिवसेनेतील गटबाजी व अंतर्गत चढाओढीतून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते.