वाशिम : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर कुणाच्याही संपर्कात नसलेले वनमंत्री संजय राठोड मंगळवारी पोहरादेवी येथे दाखल झाले. यावेळी संजय राठोड य...
वाशिम : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर कुणाच्याही संपर्कात नसलेले वनमंत्री संजय राठोड मंगळवारी पोहरादेवी येथे दाखल झाले. यावेळी संजय राठोड यांच्या स्वागतासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. राज्यात कोरोना वाढत असून त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी मार्गदर्शकतत्त्वे लागू केली आहेत. परंतु, वनमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी कोरोना गाईडलाईन्सचा फज्जा उडवल्याचे दुर्दैवी चित्र वाशिम येथे दिसून आले.
राज्यात कोरोनाचं संकट वाढत असताना रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संसर्ग वाढणार नाही याची योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्यातील जनतेला केले होते. परंतु, त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्याने मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे. पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीत कोरोनाच्या नियम पायदळी तुडवण्यात आले. संजय राठोड यांच्या स्वागतासाठी पोहरोदेवी येथे जमलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. या गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाशिम आणि यवतमाळमध्येही कोरोनाची रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. संजय राठोड यांच्या समर्थकांनी केलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढल्यास त्याला जबाबदार कोण ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सर्वांवर कारवाई करणार का ? असे अनेक प्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत.
तात्काळ गुन्हा दाखल करा : प्रवीण दरेकर
राज्यात कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी सोशल डिस्टंन्सींग आणि मास्क घालण्याचे आवाहन केलेय. त्यांच्या आवाहनावर भाजपतर्फे वाढीव वीज बिलांच्या विरोधात 24 फेब्रुवारी रोजी प्रस्तावित आंदोलन मागे घेतलेय. याउलट मंत्र्यांचे कार्यकर्ते नियमांची पायमल्ली करून कोरोना नियमांचा फज्जा उडवत आहेत. हा प्रकार गंभीर असून उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि ठाकरी बाणा दाखवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.