पुणे/प्रतिनिधीः दुचाकीला दोन आरसे नसल्यास दोनशे रुपये दंड वसूल करण्याची कारवाई वाहतूक पोलिसांनी सुरू केल्यामुळे दुचाकीचालक मेटाकुटीला आले आह...
पुणे/प्रतिनिधीः दुचाकीला दोन आरसे नसल्यास दोनशे रुपये दंड वसूल करण्याची कारवाई वाहतूक पोलिसांनी सुरू केल्यामुळे दुचाकीचालक मेटाकुटीला आले आहेत. आरसे चोरीला गेल्यावर पोलिस गुन्हा दाखल करीत नाहीत; मात्र आरसा नसल्यास दंड करतात, या कात्रीत दुचाकीचालक सापडले आहेत. या कात्रीत दुचाकीचालक सापडले आहेत. शहरात गेल्या 40 दिवसांत तब्बल 22 हजारांहून अधिक पुणेकरांना त्यांच्या दुचाकीला आरसा नसल्यामुळे पोलिसांकडे दंड भरावा लागला आहे.
शहरात पोलिसांकडून पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई सुरू झाली आहे. ‘वरून’ आदेश आल्यामुळे ही कारवाई सुरू झाल्याचे कनिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचार्यांचे म्हणणे आहे. शहरात दुचाकी वाहनांची संख्या तब्बल 31 लाखांहून अधिक आहे. शहराच्या मध्यभागात दुचाकी वाहनांसाठी पुरेसे पार्किंग नाही. त्यामुळे दुचाकी वाहने उभी करताना त्यांचे आरसे तुटतात. त्याचप्रमाणे उपद्रवी घटकांकडून आरसे चोरले जातात; मात्र त्याबद्दल पोलिस चोरट्यांवर गुन्हे दाखल करीत नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी, आरशांबाबत 25 डिसेंबरपासून कारवाई सुरू झाली असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, की गेल्यावर्षी 143 अपघाती मृत्यू झाले आहेत. त्यातील 77 जण दुचाकीवर होते. त्यामध्ये 46 दुचाकी वाहनांना दुसर्या वाहनाने पाठीमागून ठोस दिली. त्यात दुचाकीवरील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जर दुचाचाकीला आरसा असता आणि वाहनचालकाने त्याचा वापर केला असता तर, कदाचित अपघात झाला नसता. मोटार वाहन कायद्यातही दुचाकीला दोन आरसे असले पाहिजे, अशी तरतूद आहे. वाहन चालविण्याचा परवाना घेताना सर्व नियम पाळण्याची ग्वाही वाहनचालकाने दिलेली असते. त्यामुळे दुचाकीला आरसे आवश्यक आहेत. चालकांच्या सुरक्षिततेसाठी या नियमाची अंमलबजावणी सुरू आहे. दुचाकी वाहनचालकाला आरसा नसल्यावर थांबवल्यावर त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, विमा पॉलिसी, नोंदणी प्रमाणपत्र (आरसीटीसी कार्ड) यांची मागणी केली जाते. संबंधित कागदपत्रे नसल्यास दंडाची रक्कम दोन हजारांपेक्षा जास्त होते. वाहनचालकाने गयावया केल्यावर थोडा फार दंड घेऊन त्याला सोडले जाते. दंड वसूल करण्याचे अधिकारी, कर्मचार्यांना वरिष्ठांनी ‘टार्गेट’ दिले, की असे प्रकार सुरू होतात.