कर्जत/प्रतिनिधी : कर्जत येथील टायरचे व्यापारी धनंजय दळवी व त्यांचे सहकारी यांची पुणे येथील गणेश पिंगळकर या इसमाने अधिकृत टायरचा विक्रेता आहे...
कर्जत/प्रतिनिधी : कर्जत येथील टायरचे व्यापारी धनंजय दळवी व त्यांचे सहकारी यांची पुणे येथील गणेश पिंगळकर या इसमाने अधिकृत टायरचा विक्रेता आहे असे सांगून फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. विश्वास संपादन करून त्याने सुरुवातीला 6 लाखांचे टायर विकत दिले. मागणी करूनही जीएसटी बिल दिले नाही.
दुसर्या वेळेस पैसे दिले असता टायर आणि पैसेही माघारी दिले नाही. या प्रकरणात कर्जत पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. पिंगळकर हा टायर कंपनीचा अधिकृत विक्रेता नसताना अधिकृत विक्रेता असल्याचे सांगत होता. दुसर्याच एका डीलरकडून टायर घेऊन इतर व्यापारी 10 टक्के डिस्काउंट देतात तर हे 15 टक्के डिस्काउंट देत होते. तक्रारदारकडून 12 लाख 83 हजार रुपये घेऊन त्यांना फक्त 6 लाख 83 हजार रुपये किमतीचे टायर पाठवून त्यांची फसवणूक झाल्याने गणेश पिंगळकर याच्याविरुद्ध कर्जत येथे गुन्हा दाखल झाला. दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये कर्जत पोलिसांनी पुणे येथे जाऊन गोपनीय व इतर माहितीच्या आधारे तपास करून गुन्ह्यात सहभागी असलेला गणेश पिंगळकर याचा मित्र सुभाष जाधव, रा. कोथरूड याला कोथरूड पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. कर्जत पोलीस आल्याचा सुगावा गणेश पिंगळकर याला लागताच त्याने पुणे सोडून मुंबईकडे पलायन केले आहे. कर्जत पोलीस पिंगळकर याचा शोध घेत आहेत. गणेश पिंगळकर याने कर्जत तालुक्यात बर्याच व्यापार्यांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. दाखल गुन्ह्यातील अटक आरोपी अमित सुभाष जाधव यास न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार आरोपी गणेश कांतराव पिंगुळकर याच्याविरुद्ध अगोदर कोल्हापूर ,जळगाव,केज येथे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस जवान सुनील खैरे, श्याम जाधव, प्रशांत राठोड यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने हे करत आहे