राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे कर्जत : जामखेडचे आ. रोहित पवार यांच्या हस्ते उद्घाटन विशाल पाटील (कराड / प्रतिनिधी) ः कराड तालुक्यातील एक छोटस...
राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे कर्जत : जामखेडचे आ. रोहित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
विशाल पाटील (कराड / प्रतिनिधी) ः कराड तालुक्यातील एक छोटस ग्रामीण भागातील तांबवे हे गाव स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून नावाने ओळखले जात असताना याच गा
वाची ओळख आता फुटबॉलचे गाव म्हणून ओळखले जावू लागण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या आठ ते नऊ वर्षापासून फुटबॉल या खेळाने या गावासह परिसरातील तरूणाईला नव्हे तर ज्येष्ठांनाही वेड लावलेल आहे. त्यामुळेच येत्या 20 फेब्रुवारीला राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन तांबवे (ता. कराड) येथे कोयनाकाठ चॅरिटेबल ट्रस्टच्या फुटबॉल टिमने केले आहे.
तांबवे येथे 2012 साली केवळ 7 ते 8 युवकांनी टाईमपास म्हणून फुटबॉल खेळण्यास सुरूवात केली होती. आज या युवकांनी सुरूवात केलेल्या फुटबॉल खेळण्यासाठी 100 युवक व जेष्ठ असतात. त्यामध्ये अवघ्या 7 वय वर्षापासून 50 पर्यंत वय असणारे जेष्ठही असतात. तांबवे गावात दररोज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हे खेळाडू एकत्र येत असतात. फुटबॉल खेळण्यासाठी तांबवेसह साजूर, उत्तर तांबवे, दक्षिण तांबवे, आरेवाडी, साकुर्डी, किरपे, वसंतगड, पश्चिम सुपने व कराड शहरातीलही युवक येत असतात. या परिसरातील फुटबॉल खेळाडूच्या दररोजच्या हजेरीमुळे तांबवे गाव हे फुटबॉलचं गाव म्हणून ओळख निर्माण करू लागले आहे.
फुटबॉल टीमने खेळाबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी कोयनाकाठ चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केलेली आहे. तसेच सन्मान परिवार असून त्यामध्ये 100 सदस्य आहेत. त्याचबरोबर ट्रेकिंग ग्रुपही असून त्यामध्ये 40 सदस्य आहेत. फुटबॉलचे वेड असलेल्या या तांबवे गावात राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या उदघाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार श्रीनिवास पाटील हे असणार आहेत.
फुटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमाकांच्या विजेत्या संघास 25 हजार 555 रूपये व ट्रॉफी, दुसर्या संघास 17 हजार 777 रूपये व ट्रॉफी, तृतीय संघास 11 हजार 111 रूपये व चतुर्थ संघास 5 हजार 555 रूपये व ट्रॉफी देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी 2 हजार रूपये प्रवेश फी असणार आहे. तसेच स्पर्धेसाठी येणार्या संघाची निवासाची व जेवणाची सोय केली जाणार आहे.