प्रा. अधिकराव कणसे यांच्या ज्ञानयात्री पुस्तकाचे प्रकाशन कराड / प्रतिनिधी ः माणसाचे कर्म सेवामय झाले की आयुष्य कृतार्थ होते. सेवानिवृत्तीच्...
प्रा. अधिकराव कणसे यांच्या ज्ञानयात्री पुस्तकाचे प्रकाशन
कराड / प्रतिनिधी ः माणसाचे कर्म सेवामय झाले की आयुष्य कृतार्थ होते. सेवानिवृत्तीच्या सत्कार हा सत्कर्माची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा असतो. प्रा. अधिकराव कणसे हे विवेकानंद संस्थेतील ज्ञानयात्री आहेतच शिवाय ते लोकमित्र आहेत. त्यांचा ज्ञानयात्री हा गौरवग्रंथ विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी दिशादर्शक असल्याचे गौरवादगार प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी काढले.
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्रा. अधिकराव कणसे यांच्या सेवागौरव व ज्ञानयात्री पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमात प्रा. अधिकराव कणसे व त्याच्या पत्नी सौ. सुरेखा कणसे यांच्या सत्कार करण्यात आला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थ सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. सतिश घाटगे, माजी प्राचार्य सुहास साळुंखे, डॉ. अशोक करांडे, अॅड. जनार्दन बोत्रे, माजी चेअरमन बाळासाहेब पाटील, प्राचार्य आर. के. भोसले, एल. जी. जाधव, डॉ. विजय माने, डॉ. अरूण गाडे, जे. ए. मेत्रे, डॉ. सुभाष शेळके, डॉ. महेश गायकवाड, डॉ. आर. जी. पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा ज्ञानमंत्र प्रा. अधिकराव कणसे यांनी घेवून अनेक पिढ्या सुसंस्कृत केल्या. आपल्या सेवाकाळात त्यांनी गुणवत्तेची आणि मानवतेची मुद्रा उमटवली. मानवी जीवनात गुणवत्ता सिध्द करण्यासाठी प्रोत्साहानाची आणि संधीची गरज असते. संधीचे जे सोने करतात ते लायक ठरतात.
प्रा. अधिकराव कणसे म्हणाले, शिक्षकांच्या जीवनात विद्यार्थी हा ज्ञान ग्रहण करणारा घटक महत्वाचा असतो. विद्यार्थ्याचे यश हे शिक्षकांना कृतार्थ, आनंददायी क्षण असतो. संस्थेच्या माध्यमातून समाजातील एक महत्वाचा घटक होण्याची संधी मिळाली. शिक्षकाने ज्ञान देण्याचे काम करत आपली यात्रा करावी. त्यामुळे आपल्या ज्ञानाचा प्रवासातील प्रत्येकाला लाभ मिळेल. मला गरिबीत मित्रांची साथ मिळाली. त्यामुळे मी उभा राहिलो. माझ्या आईचे संस्कार मोलाचे असल्याचे यशस्वी पाऊल टाकता आले.
यावेळी उपप्राचार्य मोहन पाटील, प्रा. पी. डी. पाटील, डॉ. जे. एस. पाटील, शरद चव्हाण, प्राचार्य बी. बी. सावंत, बाळासाहेब पाटील, ए. एम. गुरव यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य सतिश घाटगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुरेश यादव यांनी केले. आभार प्रा. आण्णासाहेब पाटील यांनी मानले.