बीड/प्रतिनिधी: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी मंत्री संजय राठोड यांना आत्महत्येला जबाबदर धरले आहे. त...
बीड/प्रतिनिधी: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी मंत्री संजय राठोड यांना आत्महत्येला जबाबदर धरले आहे. त्यामुळे राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे असे वाटले होते; मात्र आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आता गुंडाळले जाण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. त्याचे कारण पूजाच्या वडीलांनी आमची कोणाविरुद्धही तक्रार नसल्याचे म्हटल्याने पोलिसांच्या तपासालाही मर्यादा आल्या आहेत.
पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी या प्रकरणातून माघार घेतली आहे. आम्हाला जगू द्या, आम्हाला कोणाविरुद्धही तक्रार करायची नाही, अशी विनंती त्यांनी केली आहे. या प्रकरणात तक्रारदारच समोर येत नसल्याने पोलिसांनादेखील कारवाई करताना मोठी अडचण होणार आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात रोज नवीन गौप्यस्फोट होत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड, अरुण राठोड यांचीच नावे घेतली जात होती; मात्र या प्रकरणात विलास चव्हाण या तरुणावरदेखील संशय व्यक्त गेला आहे. विलास चव्हाण हा एक महत्त्वाचा दुवा असल्याचे मानले जात आहे. विलासला ताब्यात घेतल्यास अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो; मात्र अद्यापर्यंत या तिघांपैकी एकानेही पूजा चव्हाण प्रकरणावर भाष्य केलेले नाही. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणाचे गूढ वाढले आहे. दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष होत नसल्याचा आरोप भाजपने केला होता; मात्र आम्ही या प्रकरणाचा तपास सर्वंच बाजूंनी करत आहोत, असे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुणे पोलिसांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली असून, आवश्यकता असल्यास मंत्री राठोड यांचीदेखील चौकशी करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.