जयपूरः एका महिला आरोपीने चक्क एका न्यायाधीशासोबतच लग्न केले. राजस्थानच्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेल्या पिंकी मीना यांना लाचखोरीच्या आर...
जयपूरः एका महिला आरोपीने चक्क एका न्यायाधीशासोबतच लग्न केले. राजस्थानच्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेल्या पिंकी मीना यांना लाचखोरीच्या आरोपात अटक झाली. मुंबई-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग बनवणार्या कंपनीकडून दहा लाख रुपयांची लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दहा दिवसांच्या अंतरिम जामीनावर असताना त्यांचा विवाह झाला. राजस्थानात सध्या या अनोख्या विवाहाची चर्चा रंगली आहे.
पिंकी मीना या पहिल्याच प्रयत्नात आरएएस अर्थात राजस्थान प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत यशस्वी झाल्या. त्यांचे पती नरेंद्र दौसा हे राजस्थानच्या बसावाचे असून राजस्थान ज्युडिशियल सर्व्हिसमध्ये निवड झाल्यापासून त्यांचे जयपूरमध्ये प्रशिक्षण सुरू आहे. मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस बनवणार्या कंपनीकडून दहा लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप पिंकी मीना यांच्यावर आहे. याप्रकरणी त्या जवळपास महिन्याभरापासून तुरूंगात होत्या. लग्नासाठी पिंकी मीना यांनी राजस्थान उच्च न्यायालयाकडे जामीन मागितला होता, त्यावर न्याायालयाने त्यांना दहा दिवसांचा अंतरिम जामिन मंजूर केला. 21 फेब्रुवारी रोजी त्यांचा जामिनाचा कालावधी संपणार आहे, त्यामुळे 21 तारखेला मीना पुन्हा तुरुगांत जातील. जानेवारी महिन्यापर्यंत मीना या राजस्थानमधील बांदीकुईच्या उपविभागीय दंडाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना 15 जानेवारी रोजी अटक केली. नंतर त्यांनी कनिष्ठ न्यायालयात लग्नाचे कारण सांगून जामीन मागितला होता; पण कनिष्ठ न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला. त्यानंतर मीना यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. न्यायाधीशासोबत लग्न केल्यामुळे तपासावर परिणाम होऊ शकतो, असे म्हणत सरकारी वकिलांनी मीना यांच्या जामिनाला विरोध केला; परंतु न्यायलयाने मीना यांना दहा दिवसांचा जामीन मंजूर केला. आता लग्न झाल्यानंतर मीना या 21 तारखेला पुन्हा सरेंडर करतील, त्यानंतर 22 फेब्रुवारी रोजी या प्रकरणी सुनावणी होणार आहे. दरम्यान, मीना यांची लग्न पत्रिकाही चांगलीच चर्चेत होती. ‘इतना ही लो थाली में व्यर्थ न जाए नाली में’ यासह कोरोनाबाबत जनजागृती करणारे संदेशही निमंत्रण पत्रिकेवर लिहिण्यात आले होते. आरोपी आणि न्यायाधीश विवाहबंधनात अडकल्याने सध्या या लग्नाची चर्चा आहे.