मुंबई/प्रतिनिधी : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक वि...
मुंबई/प्रतिनिधी : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळाबाबत चर्चा केली. दोन्ही वैधानिक विकास महामंडाळांचा कालावधी 30 एप्रिल 2020 ला संपला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी हे महामंडळ गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने ऐकले नाही तर याद राखा. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आम्ही सरकारला सोडणार नाही, असा इशारा मुनगंटीवार यांनी दिला. राज्य सरकार 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन राज्यपालांशी खुला संघर्ष करत आहे. दुसरीकडे वेगवेगळ्या विभागांचा असमतोल विकास करायचा आणि तिजोरीवर डाका टाकायचा, सरकारमध्ये सध्या हेच सुरू असल्याचा गंभीर आरोप मुनगंटीवार यांनी केला. विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळासाठी टोकाचा संघर्ष करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. विधानसभेत याबाबत हक्कभंग आणणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचा उमेदवार द्यायचा की नाही हे आमचे नेते ठरवतील. विरोधी पक्षाला उपाध्यक्षपद देण्याचे संकेत आहेत. ते पाळण्याविषयी सरकार काहीच बोलत नाही. एक पाऊल त्यांनी चालावे एक पाऊल विरोधी पक्षाने पुढे यावे. तुम्ही उमेदवार उभा करू नका आणि आमची हेकड भूमिका सहन करा, असे नसल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. कोरोना एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे वेगाने रंग बदलतो, अशी मिश्किल टिप्पणी मुनगंटीवारांनी केली. प्रदेशाध्यक्षांची मिरवणूक असेल तर कोरोना नाही; मात्र अधिवेशन असेल तर कोरोना आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी कोरोना आहे. अधिवेशनाची वेळ आली की सरकारमधील मंत्री लगेच कोरोना वाढतो आहे, असे सांगतात आणि टाळेबंदीची भाषा करू लागतात, असा जोरदार टोलाही त्यांनी लगावला.