कुणालाही कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. त्यातून पैसे कमविण्याचाही अधिकार आहे; परंतु भयभीत झालेल्या नागरिकांच्या भावनांचा गैरफायदा उठवू...
कुणालाही कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. त्यातून पैसे कमविण्याचाही अधिकार आहे; परंतु भयभीत झालेल्या नागरिकांच्या भावनांचा गैरफायदा उठवून गल्ले भरणं चुकीचं आहे. दुसर्यांना चुकीचं ठरवून, आपलीच उत्पादनं कशी चांगली आहेत,हे सांगणंही तर्कसंगत नाही. न्यायालयानं याबाबतीत पतंजली उद्योग समूहाची चांगलीच कानउघाडणी केली आहे. असं असताना आता जागतिक आरोग्य संघटनेच्या नावाचा दुरुपयोग करून कोरोनीलच्या नावाखाली गल्लाभरू उद्योग करणं चुकीचं आहे.
आपल्या उत्पादनाची गुणवत्ता असेल, तर त्याला जाहिरात करण्याचीही गरज नसते; परंतु हल्लीचं युग जाहिरातीचं आहे. आपल्या उत्पादनाची जाहिरात करताना आपली उत्पादनं कशी आहेत, हे सांगणं जाहिरातीच्या नियमांना धरून आहे. दुसर्याच्या उत्पादनांचा दर्जा कमी आहे, असं सांगणं म्हणजे आपल्या उत्पादनाबाबत सांगण्यासारखं काहीच नाही, या निष्कर्षाप्रत येता येतं. दुसर्याची रेष कमी करून आपली रेष मोठी होत नसते. दुसर्याला कमी लेखून आपलं मोठंपण सिद्ध होत नसतं. एकवेळ केलेली दिशाभूल पचनी पडते; परंतु वारंवार दिशाभूल केली, तर ती पचनी पडत नसते. जाहिरात हे असंच शस्त्र असून नसलेल्या गोष्टी त्यात मिसळून सांगितल्या जातात. त्यात बाबा रामदेव यांची पतंजली माहीर आहे. पतंजली आश्रमाला जेवढं मार्केटिंग जमलं, तेवढं जगात कुणाला जमलं नसेल. स्वदेशीच्या नावाखाली आणि इतर उत्पादनांबाबत दिशाभूल करणार्या जाहिराती करून त्यांनी देशातील जनतेच्या मनात घर केलं. आयुर्वेदिक उत्पादनासह अन्य उत्पादनांची दहा हजार कोटी रुपयांची बाजारपेठ त्यांनी तयार केली; परंतु त्यांच्याच उत्पादनांची गुणवत्ता कशी खालावली आहे, हे वेगवेगळ्या न्यायालयांच्या निकालांनी दाखवून दिलं. देशात कोरोनाचं संकट असताना त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेऊन कोरोनील नावाचं औषध बाजारात आणलं. त्यातील दाव्यात किती विसंगती होती आणि हे दावे किती अवैज्ञानिक होते, हे देशातील तज्ज्ञांनी वारंवार सांगितलं; परंतु सरकारचं पाठबळ असलेल्या बाबा रामदेव यांना कुणाची फिकीर नव्हती. न्यायालयानं गेल्या आठ महिन्यांपूर्वीच कोरोनील नाव वापरायला बंदी घातली होती. आता पुन्हा एकदा रामदेव बाबा यांनी कोरोना विषाणूवरचं प्रमाणित औषध बाजारात आणल्याचा दावा केला. याचसोबत पतंजलीचा वैज्ञानिक रिसर्च पेपरदेखील लॉन्च केला गेला आहे. या लॉन्चिंग कार्यक्रमाला देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन तसेच रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. खरंतर आरोग्यमंत्र्यांनी अशा खासगी औषधांच्या लाँचिंगला उपस्थित राहणं चुकीचं आहे. त्यातच त्यांच्यासमोर अवैज्ञाविक दावे करणं चुकीचं होतं. आरोग्यमंत्री स्वतः एक डॉक्टर आहेत; परंतु बाबा रामदेवांच्या आशीर्वादानंच हे सरकार आल्याचा काहींचा समज आहे. आम्ही लॉन्च केलेला रिसर्च पेपर कोरोना विषाणूच्या पहिल्या प्रमाणित औषधाशी संबंधित आहे. पतंजलीद्वारे कोव्हिडसाठी पहिलं प्रमाणित औषध सादर करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे, असं पतंजली आयुर्वेदनं ट्वीट करून म्हटलं आहे. आम्ही योग आणि आयुर्वेद यांना समांतर पातळीवर पुढं नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. कोरोनील कोट्यवधी लोकांना जीवन देत आहे. आता वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे आम्ही लोकांना ज्या शंका होत्या त्या दूर केल्या आहेत, असं पतंजलीनं म्हटलं असलं, तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही हे औषध प्रमाणित केल्याचा दावा पतंजलीनं केला आहे. भारतातील कोट्यवधी लोकांनी कोरोना विषाणूवर मात केली, ती केवळ आपल्या औषधामुळं असा दावा करायला कंपनी विसरली नाही; परंतु नेमकं त्याच वेळी भारतात सात दिवसांत कोरोनाचे एक लाख रुग्ण वाढले, याचा अर्थ काय घ्यायचा? कोट्यवधी लोक औषध घेत असतानाही कोरोनाचा विळखा कसा दूर झाला नाही, याचं उत्तर बाबा रामदेव सांगत नाहीत. कोरोनावर उपचार करण्यात आपली आधुनिक उपचार पद्धती आणि योग आणि आयुर्वेदाचा फार मोठा वाटा आहे. कोट्यवधी लोक आपल्या घरामध्ये राहून काढा पीत होते, योग करत होते, असं रामदेव म्हणाले. औषधामुळं किती लोक बरे झाले, हे ते सांगत नाहीत. बाबांच्या म्हणण्यानंतर पतंजली कंपनीच्या कोरोनावरील औषधावरून जोरदार वाद सुरू झाला. रामदेव बाबांनी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोनील या औषधाचं लाँचिंग केलं. तसंच या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेचं प्रमाणपत्र मिळाल्याचं म्हटलं. बाबा रामदेव यांचे दावे किती तथ्यहीन आहे आणि ते जागतिक आरोग्य संघटनेच्या नावाचा कसा दुरुपयोग करीत आहेत, हे लगेच स्पष्ट झालं. जागतिक आरोग्य संघटनेनं आपण अशा कोणत्याही पारंपारिक/आयुर्वेदिक औषधाची तपासणी केलेली नाही आणि प्रमाणपत्र दिलेलं नाही, हे सांगितलं, ते बरं केलं. त्यामुळं पतंजली तोंडावर आपटली. ’इंडियन मेडिकल असोसिएशन’नंदेखील रामदेव बाबांच्या या दाव्यावर आक्षेप घेतला. तसंच पतंजलीचं औषध कोरोनापासून संरक्षण करत असेल, तर मग कोरोना लसीकरणावर 35 हजार कोटी रुपयांचा खर्च कशासाठी केला जात आहे, असा प्रश्न विचारला आहे. आयएमएनं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत असा अवैज्ञानिक दावा कसा केला जाऊ शकतो असा सवाल केला आहे. तसंच त्यांच्या उपस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणपत्राविषयी सरळसरळ खोटं सांगण्यात आलं. यावर आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी उत्तर द्यावं, अशीही मागणी करण्यात आली. आयएमएनं म्हटलं आहे, की भारताचे आरोग्यमंत्री म्हणून तुमच्या समोर अशाप्रकारे खोटं सांगणं किती योग्य आणि तर्कसंगत आहे? अशाप्रकारच्या अवैज्ञानिक औषधाचे लाँचिंग करणं कितपत बरोबर आहे? आरोग्यमंत्री स्वतः एक डॉक्टर आहेत, तरीही ते अशाप्रकारच्या औषधाला प्रोत्साहन देत आहेत हे किती नैतिक आहे? हे औषध म्हणजे लोकांनी फसवणूक असून पतंजलीचा दावा थेट जागतिक आरोग्य संघटनेनं खोडल्यानं देशाचीही जागतिक पातळीवर नाचक्की झाली आहे.
जागतिक आरोग्य संघटना आणि इंडियन मेडिकल असोसिएशननं पतंजलीच्या दाव्यावर आक्षेप घेतला, तेव्हा पतंजलीला पश्चातपुद्धी झाली. कोरोनीलवरुन झालेला वाद वाढताना पाहून पतंजलीनं त्यावर स्पष्टीकरण दिलं. पतंजलीचे आचार्य बालकृष्ण म्हणाले, की आम्ही काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. आमच्या औषधाला मिळालेलं प्रमाणपत्र जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेलं नाही. हे प्रमाणपत्र भारत सरकारच्या विभागानं दिलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं आमच्या औषधाला मंजुरी दिलेली नाही किंवा नाकारलेलंदेखील नाही. मग, अगोदर तसं का सांगितले, याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही. पतंजलीनं कोरोनाविरोधात खात्रीशीर उपचार शोधल्याचा दावा करणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फसवणूक आहे. देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याअगोदर रामदेव बाबा यांनी 23 जून रोजी कोरोना विषाणूच्या संसर्गावर पहिलं आयुर्वेदिक औषध शोधल्याचं जाहीर केलं. त्यानंतर अवघ्या काही तासातच आयुष मंत्रालयानं या औषधांच्या जाहिरातीवर बंदी घातली होती. आयुष मंत्रालयानं पतंजलीच्या औषधाची तपासणी होईपर्यंत जाहिरात थांबविली होती. आयुष मंत्रालयानं बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीकडं या औषधाबाबत सविस्तर माहिती देण्याचे आदेश दिले होेते. या औषधाचं कशाप्रकारे संशोधन करण्यात आलं, याबाबत सविस्तर माहिती मागितली आहे. त्याचबरोबर उत्तराखंड सरकारकडंही या औषधाच्या परवानाबाबतची माहिती मागितली होती. हे औषध घेतलं, तर सात दिवसांत कोरोना बरा होतो, असा दावा बाबा रामदेवांनी केला होता. या औषधाशी संबंधित वैज्ञानिक दावांचा कोणताही तपशील आयुष मंत्रालयाकडं नाही, असं आयुष मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. संबंधित आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपनीला सांगितलं गेलं आहे, की ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज कायदा (आक्षेपार्ह जाहिरात कायदा) 1954 च्या तरतुदीनुसार अशी औषधं तपासणीनंतर जाहीर केली जातात, असं आयुष मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीला औषधांचे तपशील लवकरात लवकर देण्यास सांगण्यात आलं आहे. विशेषतः ज्या हॉस्पिटलमध्ये संशोधन केलं त्याबद्दलदेखील माहिती मागवण्यात आली आहे. औषधांशी संबंधित प्रोटोकॉल, सँपल साईज, इंस्टिट्यूशनल अॅेथिक्स कमेटी क्लियरन्स, उढठख रजिस्ट्रेशन आणि रिसर्च संबंधित रिझल्ट यांचा डेटा मागितला आहे, असं आयुष मंत्रालयानं सांगितलं आहे. कोरोनावरील औषध ‘कोरोनिल’ बनवल्याचा दावा करणार्या पंतजलीच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. उत्तराखंड आयुर्वेद विभागानं नोटीस जारी करत पतंजलीलाला औषध लॉन्च करण्याची परवानगी कोणी दिली, असा सवाल उपस्थित केला आहे. पतंजलीच्या आवेदनावर आम्ही परवाना जारी केला. या आवेदनात कुठंही कोरोना विषाणूचा उल्लेख नव्हता. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, कफ आणि तापाचं औषध बनवण्यासाठी परवाना घेत असल्याचं म्हटलं आहे, अशी माहिती उत्तराखंड आयुर्वेद विभागाच्या अधिकार्यांनी दिली. याप्रकरणी पतंजलीला नोटीस पाठवण्यात आल्याचंही अधिकार्यानं सांगितलं होतं. या सर्वांचा अर्थ स्पष्ट आहे, की पतंजली दिशाभूल करून पैसा कमवण्याच्या उद्योगात गुंतली आहे.