पुणे/प्रतिनिधीः मुळशी तालुक्यातील कोळवण जवळील वाळेन येथे एकाच कुटुंबातील पाचजण बुडून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना आज (रविवारी) घडली आह...
पुणे/प्रतिनिधीः मुळशी तालुक्यातील कोळवण जवळील वाळेन येथे एकाच कुटुंबातील पाचजण बुडून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना आज (रविवारी) घडली आहे. पाचही मृतदेह ओढ्यातून बाहेर काढण्यात मुळशी आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला यश आले.
शंकर दशरथ लायगुडे (38), पोर्णिमा शंकर लायगुडे (36), आर्पिता शंकर लायगुडे (20), अंकिता शंकर लायगुडे (13) आणि राजश्री शंकर लायगुडे (12), सर्वजण रा. वाळेन, ता. मुळशी, जि. पुणे) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पोर्णिमा या रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गावातील ओढ्याला धुणी धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचा पाय घसरला आणि त्या ओढयात बुडाल्या. त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या तिन्ही मुलींनी तत्काळ ओढयाकडे धाव घेतली आणि त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले; मात्र त्या तिन्ही मुलीदेखील एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात ओढयात बुडाल्या. हा प्रकार शंकर दशरथ लायगुडे यांना समजल्यानंतर त्यांनीदेखील ओढयाकडे धाव घेतली आणि कुटुंबाला वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु तेदेखील ओढ्यात बुडाले. दरम्यान, मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथकास याबाबतची माहिती कळविण्यात आली. त्यांनी ओढ्यात बुडालेले सर्व मृतदेह पाण्याबाहेर काढले. पुढील उत्तरीय तपासणीसाठी हे मृतदेह पौड येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आलेले असून घटनास्थळी पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनचे प्रमोद बलकवडे यांनी सतर्कतेने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी सचोटीने प्रयत्न केले.