जयपूरः राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील संघर्ष संपला नसल्याचे शुक्रवारी जयपूरच्या कोटखावडा येथे झालेल्या किसान मह...
जयपूरः राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील संघर्ष संपला नसल्याचे शुक्रवारी जयपूरच्या कोटखावडा येथे झालेल्या किसान महापंचायतीतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. या महापंचायतीच्या निमित्ताने माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी शक्तीप्रदर्शन केले. त्यांच्या पाठीराख्यांनी या वेळी गेहलोत यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही.
या महापंचायतीच्या व्यासपीठावर पायलट यांच्या 16 समर्थक आमदारांनी हजेरी लावली. काँग्रेस पक्षश्रेष्ठींना प्रचंड गर्दी जमवून आपली पकड व ताकद दाखवून देण्यात पायवलट यशस्वी झाले. मुख्यमंत्री गेहलोत, राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदसिंग डोटासरा आणि गेहलोत गटाच्या नेत्यांना या कार्यक्रमास आमंत्रित करण्यात आले होते; परंतु कोणीही तिकडे फिरकले नाहीत. जयपूरमध्येच दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांचा स्वतःचा कार्यक्रम असल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे ते आले नाहीत. या महापंचायतीला पायलट समर्थक आमदार विश्वेन्द्र सिंह, हेमाराम चौधरी, मुरारीलाल मीना, ब्रिजेंद्रसिंग ओला, रमेश मीना, वेद प्रकाश सोलंकी, हरीश मीना, जीआर खटाणा, इंदराज गुर्जर, राकेश पारीक, अमरसिंह जाटव, सुरेश मोदी, मुकेश भाकर, पीआर मीना हे 14 आमदार उपस्थित होते. पायलट समर्थक आमदार दीपेंद्रसिंह शेखावत, रामनिवास गावडिया आणि भंवरलाल शर्मा हे या महापंचायतीला उपस्थित नव्हते. महापंचायतीत पोहोचलेल्या या 14 आमदारांव्यतिरिक्त आणखी दोन आमदारांच्या उपस्थितीने सर्वांना धक्का बसला. आमदार प्रशांत बैरवा आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नारायणसिंग यांचे पुत्र वीरेंद्र सिंह यांची हजेरी चर्चेचा विषय बनली होती. ते येताच पायलट समर्थकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. बैरावा हे पूर्वी पायलट गटात होते; परंतु मागील वर्षी जुलैमध्ये पायलट आणि गेहलोत यांच्यात झालेल्या संघर्षाच्या वेळी ते गेहलोत गटात गेले होते. त्यांच्या उपस्थितीने तेे पुन्हा पायलट गटात परतत आहेत का, याची चर्चा सुरू होेती. विरेंद्र सिंग यांचा कल पायलट यांच्याकडे होता. या वेळी पायलट गटाचे आमदार विश्वेन्द्रसिंग यांनी भाषणादरम्यान गेहलोत यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ’आधी आम्हाला 99 जागा मिळाल्या, त्यानंतर 101 जागा मिळाल्या. कोणीतरी कठोर परिश्रम केले पाहिजे. विश्वेंद्र यांच्या या वाक्यावर टाळ्या आणि पायलट समर्थनाच्या घोषणा देण्यात आल्या. पायलट यांनी सर्वंच मंत्र्याना या किसान पंचायतीसाठी फार अगोदर निमंत्रण देऊनही गेहलोत गटाच्या कोणीही आमदार आणि मंत्र्यांनी तिथे हजेरी लावली नाही. पायलट यांची महापंचायतीची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पोटनिवडणुकीनिमित्त कार्यक्रम ठेवला. पायलट यांच्या कार्यक्रमाकडे फारसे कुणाचे लक्ष जाणार नाही, अशी त्यामागची व्यूहनीती होती. पायलटच्या महापंचायतीकडे लोकांचे आणि माध्यमांचे लक्ष जास्त असू नये.
हुकूमशाहीविरुद्ध लढू
या महापंचायतीत पायलट म्हणाले, की दिल्लीत कोणीही शेतकर्यांचे म्हणणे ऐकत नाही. आम्हाला केंद्राविरुद्ध संघर्ष करावा लागेल. सहानुभूतीची नव्हे, तर सहकार्याची गरज आहे. आम्ही केंद्राच्या हुकूमशाहीविरूद्ध जोरदार लढा देऊ. शेतकरी आणि तरुण आज एकत्र उभे आहेत. आमचे नेते राहुल गांधी राजस्थानात आले, प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात सर्वत्र फिरत आहेत. आपल्याही त्याच पातळीवर संघर्ष करावा लागेल.