इस्लामपूर / प्रतिनिधी : बीड, उस्मानाबाद, जालना, अहमदनगर, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील ऊस तोडणी मुकादमांनी वाळवा तालुक्यातील ऊस वाहतूक करणार्...
इस्लामपूर / प्रतिनिधी : बीड, उस्मानाबाद, जालना, अहमदनगर, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील ऊस तोडणी मुकादमांनी वाळवा तालुक्यातील ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टर मालकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याने त्यांच्या पुढे जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. हे पैसे वसूल करण्यास पोलीस खात्याने मदत करावी, अशी मागणी ट्रॅक्टर मालकांनी जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षीत गेडाम यांच्याकडे केली आहे. सांगली जिल्ह्यात फसवणूक केलेल्या तोडणी मुकादमांच्या विरोधी पोलीस गुन्हे दाखल करून घेण्यास मदत करू, याशिवाय त्या भागातही पोलीस खाते आपणास सहकार्य करेल, अशी ग्वाही गेडाम यांनी दिल्याने ट्रॅक्टर मालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांच्या हस्ते गेडाम यांना याबाबतचे निवेदन दिले. कारखान्याच्या पुढाकाराने वाळवा तालुक्यातील ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टर मालकांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक विराज शिंदे, श्रेणीक कबाडे, माणिक शेळके, माजी संचालक नारायण पाटील, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टर मालक संघटनेचे पोपटराव जगताप (येवलेवाडी), आष्ट्याचे राजू अत्तार, जितेंद्र शिंदे यांच्यासह वाळवा तालुक्यातील ट्रॅक्टर मालक उपस्थित होते.
ट्रॅक्टर मालकांची कैफियत मांडताना पी. आर. पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यातील 60-70 ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टर मालकांची साधारण 4-5 कोटी रुपयांच्यावर फसवणूक झाली आहे. या ट्रॅक्टर मालकांनी फसवणूक करणार्यांच्या मागे पैसे परत करण्याचा तगादा लावला असता त्यांच्याकडून खोट्या गुन्हे दाखल केल्या जात आहेत. मुकादमांना इकडे आणल्यास अपहरणसारख्या गुन्ह्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा दुहेरी आर्थिक कोंडीत वाळवा तालुक्यातील ऊस वाहतूक कंत्राटदार सापडला आहे. अनेक मालक या तणावामुळे सध्या दवाखान्यात उपचार घेत आहेत. कारखाना ट्रॅक्टर मालकास पाच लाख रुपयाची उचल देतो. ट्रॅक्टर मालक त्यात आपले पैसे घालून साधारण 7 लाखापासून 14 लाखापर्यंतची रक्कम मुकादमांना दिली जाते. मुकादम करार करतात, पैसे उचलतात. मात्र, ऊस तोडणी मजूर घेवून येत नाहीत. त्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेडाम यांनी ट्रॅक्टर मालकांचे गार्हाणे ऐकून घेत पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी त्यांनी काही संबंधित अधिकार्यांना फोन लावून काही सूचनाही दिल्या आहेत.
कायमचा तोडगा कधी निघणार?
पुणे येथील साखर आयुक्तालयामध्ये राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह साखर उद्योगाशी संबंधितांची बैठक गेल्या महिन्यात झाली. या बैठकीमध्ये या विषयावर कायमचा तोडगा काढण्याबद्दल बरीच चर्चा झाली. यावेळी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी सर्व ऊस तोडणी मुकादमांची ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. त्यांनी कोणत्या साखर कारखान्याकडे किती करार केला याची माहिती सर्वांना समजेल. यातून फसवणुकीचे प्रकार घडणार नाहीत, अशी सूचना केली. यावेळी त्यांच्या या सुचनेचे सर्वांनी स्वागत केले.