महाराष्ट्रात सुरुवातीपासून कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. ही संख्या आटोक्यात ठेवण्यात मध्यंतरी यश आलं; परंतु कोरोनाला हरविलं, अशा थाटात आ...
महाराष्ट्रात सुरुवातीपासून कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. ही संख्या आटोक्यात ठेवण्यात मध्यंतरी यश आलं; परंतु कोरोनाला हरविलं, अशा थाटात आपण वावरायला लागलो आणि त्याचे परिणाम आता बाधितांची संख्या मोठ्या वेगानं वाढण्यात झाला. आयुष्यात स्वयंशिस्तच यशाचा मार्ग दाखवित असते. तसंच साथीच्या आजारातही स्वयंशिस्त पाळली नाही, तर एकूणच समाजव्यवस्थेला ते धोकादायक ठरत असते. स्वयंशिस्त न पाळल्यानंच आता कोरोबाधितांची संख्या वाढत असून या संकटाला इतर कुणी नाही, तर मी जबाबदार आहे, असं समजून वागलं, तरच त्यावर मात करता येईल.
कोरोनासारख्या साथीच्या महाभयंकर आजारावर मात करायची असेल, तर जगानं मुखपट्टी, सामाजिक अंतर भान आणि वारंवार हाताची स्वच्छता या त्रिसूत्रीवर भर दिला. ही त्रिसूत्री एकदा का विसरली, की मग कोरोनाला निमंत्रण दिल्यासारखंच असतं. सध्या त्याचा अनुभव येतो आहे. नागरिकांना कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानंतर कोरोनाविषयक त्रिसूत्रीचा विसर पडला. धार्मिक, राजकीय आणि सामाजिक कार्यक्रम वाढले. बाजारपेठा फुलल्या. गर्दी वाढली. त्यातून कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढायला लागली. थेट केंद्र सरकारनं दखल घेतली. मुंबई, पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भासह संपूर्ण राज्यात रुग्णांची संख्या वाढली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्वांनी सल्ला देऊनही कुणी ऐकायला तयार नव्हतं. स्वयंशिस्त न पाळल्यानं कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझं कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम उघडली. त्याचे परिणामही चांगले दिसले; परंतु कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला. मुंबईसह राज्यांत बाधितांची संख्या वाढल्यानं आता राज्य सरकारलाच काही पावलं उचलावी लागली आहेत. मुखपट्टी घाला, शिस्त पाळा आणि टाळेबंदी टाळा असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ’मी जबाबदार’ या मोहिमेची घोषणा केली. गर्दी वाढत असून राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना यापुढं परवानगी मिळणार नाही तसंच नियम न पाळणारेही मंगल कार्यालयं, सभागृहं, हॉटेल्स, उपाहारगृहं यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. दरम्यान, कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं अमरावती, अचलपूर शहरांमध्ये सोमवारी रात्रीपासून टाळेबंदी, तर नाशिक आणि पुणे शहरात रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी रविवारी जनतेला ’सोशल मीडिया’च्या माध्यमातून संबोधित केलं. संसर्ग रोखण्यासाठी अमरावती विभागात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. जिथं जिथं आवश्यकता असेल तिथल्या जिल्हा प्रशासनानं आवश्यक ते निर्बंध घालण्याचे निर्देश ठाकरे यांनी दिले आहेत. ज्यांना टाळेबंदी हवी आहे, त्यांनी मुखपट्टी घालू नये आणि आरोग्याची कुठलीही शिस्त पळू नये, अशी भाषा मुख्यमंत्र्यांना वापरावी लागली. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली, की नाही, हे पंधरा दिवसांत कळू शकेल आणि राज्यात टाळेबंदी लावायची, की नाही याचा निर्णय पुढील आठ दिवसांत जनतेनं करायचा आहे, असं जेव्हा मुख्यमंत्री सांगतात, तेव्हा त्यांचा संताप असतो; परंतु संयत पद्धतीनं ते तो व्यक्त करतात. राज्य सरकार सर्व प्रयत्न करीत असतानाही जनता जेव्हा ऐकत नाही, त्या वेळी अशी उद्वेगाची आणि हतबलतेची भाषा येत असते. टाळेबंदीचे काय परिणाम झाले, हे जनतेला चांगलंच अवगत आहे. बेरोजगारी वाढते. रोजगार जातो. त्यामुळं टाळेबंदी नको असेल, तर लोकांनाच स्वयंशिस्त पाळावी लागेल. अमरावतीय वर्धा, यवतमाळमध्ये 36 तासांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर आठवडाभर रात्रीची संचारबंदी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं पुणे आणि नाशिक शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत शाळा, महाविद्यालयं बंद राहणार असून रात्री 11 ते सकाळी सहा वाजेपर्यंत मर्यादित स्वरूपाची संचारबंदी असेल, तर नाशिक शहरातही सोमवारपासून आठवडाभर रात्री 11 ते सकाळी पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. शहरातील शाळा-महाविद्यालयं सुरूच राहणार आहेत. पंतप्रधानांसमवेत नीती आयोगाच्या बैठकीत कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत धोरण असावं, याचा पुनरुच्चार करून शक्य असेल त्यांनी घरूनच काम करावं, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. त्यामुळं येत्या काही दिवसांत मुंबईतील कार्यालयीन कामकाजाच्या वेळा बदलण्याची शक्यता आहे. पाश्चिमात्य देशांत कोरोना मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळं मोठे निर्बंध लादण्यात आले आहेत. आपल्याकडंही सर्व काही खुले करा म्हणून नियम मोडून आंदोलनं करणारं आता संसर्ग पसरतो, तेव्हा वाचवायला येणार नाहीत, असं सांगून आंदोलनं करणार्या भाजपला मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला. सामाजिक जबाबदारी ठेवून वागणं महत्त्वाचं आहे, असं सांगून मुख्यमंत्र्यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यांच्या मुलाचा विवाहाचा स्वागत सोहळा रद्द करून भान ठेवलं, यासाठी त्यांचं अभिनंदन केलं. ‘मी जबाबदार’ मोहीम : माझं कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम यशस्वी झाली. आता आपण सर्व काही खुलं केलं आहे. त्यामुळं मुखपट्टी घालणं, हात सतत धूत राहणं ही व्यक्तिगत जबाबदारी असून ती सर्वांनी पार पाडण्यासाठी मी जबाबदार मोहीम सुरू करीत आहोत, असं ठाकरे म्हणाले. मालवाहतूक नेहमीप्रमाणं सुरू राहणार असून, वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाहीत. सर्व प्रकारची सार्वजनिक व खासगी वाहतूक अतिआवश्यक कामासाठी संबंधित क्षेत्रातील पोलिस निरीक्षकांची पूर्वपरवानगी घेऊन परवानगी राहील. प्रतिबंधात्मक क्षेत्रातील सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकानं, किराणा, औषधी दुकानं, स्वस्त धान्य दुकानं ही सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहतील. सर्व प्रकारची बिगर आवश्यक दुकानं, आस्थापना बंद राहणार आहेत. उपहारगृहं, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधा देण्यास परवानगी राहणार आहे. लग्न समारंभासाठी पंचवीस व्यक्तींना (वधू व वरासह) मुभा राहणार असून; मात्र यासाठी तहसीलदारांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. सिनेमागृहं, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्यानं, नाट्यगृहं, प्रेक्षकगृहं व इतर संबंधित ठिकाणं बंद राहतील. संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलनं या कालावधीत बंद राहतील. प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळं नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील. शाळा, महाविद्यालयं, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रं, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहणार आहेत. मुंबई शहरात दरदिवशी नव्यानं निदान होणार्या कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा जवळपास हजारांच्या घरात पोहोचल्यामुळं रुग्णालयात दाखल होणार्या रुग्णांच्या संख्येतही दुपटीनं वाढ झाली आहे. रुग्णालयातील बहुतांश रुग्ण 50 वर्षांवरील असून त्यांना मध्यम स्वरूपाची लक्षणं असल्याचं अहवालावरून दिसून येत आहे. मुंबईत कोरोनाचा प्रसार झपाट्यानं वाढत असून आठवडाभरात रुग्णसंख्या चौपटीनं वाढली आहे. दरदिवशी नव्यानं निदान होणार्या रुग्णांचं प्रमाण तीनशेवरून पुन्हा हजारापर्यंत वाढल्याची नोंद आहे. त्यामुळं मुंबईतील कोरोना रुग्णालयातील खाटा पुन्हा भरू लागल्या आहेत. मुंबईतील मोठं कोरोना रुग्णालय असल्यानं आत्तापर्यंत दरदिवशी जवळपास 35 ते 40 रुग्ण दाखल होत होते; परंतु या आठवड्यात ही संख्या 70 ते 80 पर्यंत पोहोचली आहे. गेल्या पाच दिवसांत 350 रुग्ण दाखल झालं असून रुग्णांचं प्रमाण जवळपास दुपटीनं वाढलं आहे. सध्या 800 हून अधिक रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनाव्यतिरिक्त उपचार सुरू केल्यानं हजार खाटांपैकी फक्त 45 खाटा कोरोनासाठी राखीव ठेवल्या आहेत; परंतु गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या वाढत आहे. या रुग्णांना सेव्हनहिल्स किंवा वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये पाठवत आहोत. या कोरोना रुग्णालयांमध्ये अनेक खाटा रिक्त आहेत. संसर्गाचं प्रमाण वाढल्यास पुन्हा कोरोना रुग्णालयात रूपांतरण करावं का, याचा विचार केला जाईल. रुग्णांची संख्या जवळपास दुपटीहून अधिक वाढली आहे. मुंबईत सध्या महापालिकेच्या रुग्णालयांत 2,463 खाटा आणि खासगी रुग्णालयांत 827 खाटा रुग्णांनी भरलेल्या आहेत. पालिका रुग्णालयांतील अतिदक्षता विभागात 320, तर खासगी रुग्णालयांत 236 रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील 11 हजार खाटांपैकी पालिका रुग्णालयांत 6219 खाटा, तर खासगी रुग्णालयात 1696 अशा एकत्रित 7915 खाटा सध्या रिक्त आहेत. गेल्या आठवड्यात मुंबईत 1998 रुग्णांचं नव्यानं निदान झालं होतं. या आठवड्यात 4776 रुग्णांची नव्यानं भर पडली आहे. बहुतांश रुग्ण 50 वर्षांवरील असून, सध्या तरी मध्यम लक्षणं असलेले रुग्ण अधिक आहेत; परंतु काही रुग्णांमध्ये त्रास झपाट्यानं वाढत असल्याचं दिसून येतं.