अमरावती/प्रतिनिधीः गेल्या काही दिवसांपासून पश्चिम विदर्भात कोरोनाने चांगलेच डोके वर काढले आहे. कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याने यवतमाळ,...
अमरावती/प्रतिनिधीः गेल्या काही दिवसांपासून पश्चिम विदर्भात कोरोनाने चांगलेच डोके वर काढले आहे. कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याने यवतमाळ, अमरावती आणि अकोला जिल्ल्ह्यात 28 तारखेपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. अमरावती जिल्ह्यात टाळेबंदी जाहीर करण्यात आली. रविवारपासून जिल्हा बंद ठेवण्यात येणार असून, केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, अशी माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
गेल्या चार दिवसांपासून अमरावतीत कोरोनाचे रुग्ण वाढत असून, 14 फेब्रुवारीला 435 रुग्ण सापडले असून, दोन जणांचा मृत्यू झाला. 15 फेब्रुवारीला 439 रुग्ण सापडले असून, चार जणांचा मृत्यू झाला. 16 फेब्रुवारीला 495 रुग्ण सापडले असून, 17 फेब्रुवारीला 498 रुग्ण सापडले, तर सहा जणांचा मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सकाळी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत यवतमाळसह आणखी दोन जिल्ह्यात टाळेबंदी लागू करावी लागेल, असे सांगितले होते. शिवसेना आमदार संजय राठोड यांच्या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संजय राठोड, यशोमती ठाकूर, बच्चू कडू यांच्याशी मी बोललो आहे. कोरोनाची परिस्थिती आणखी गंभीर झाली तर तिथे टाळेबंदी करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे मी त्यांच्या कानावर घातले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले होते. अकोला, अमरावती, यवतमाळमध्ये लॉकडाऊन करण्याचे स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार टाळेबंदी लागू करण्यात आली. विदर्भात अकोल्यात 74, अमरावतीत 82, अमरावती मनपा क्षेत्रात 310, यवतमाळमध्ये 71 कोरोना रुग्ण आढळले आहेत. अकोला परिमंडळातच एकूण 662 रुग्ण आढळले आहेत. या तिन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासन अॅलर्ट झाले आहे.
तुळजापुरात निर्बंध
तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील दर्शन पासची संथ्या निम्यावर आणण्यात आली आहे. तसेच वृद्ध भाविक आणि लहान मुलांना मंदिरात प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला. तुळजाभवानी मंदिरात रोज 20 हजार भाविकांना दर्शनासाठी परवानगी दिली जात होती; मात्र आता रोज फक्त दहा हजार दर्शन पास दिले जाणार आहेत. तर दोन हजार पेड पास दिले जातील. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबत लेखी आदेश दिले आहेत.