इस्लामपूर / प्रतिनिधी : वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बहे येथे गॅस दर वाढीच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन करण्यात आले. महिल...
इस्लामपूर / प्रतिनिधी : वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बहे येथे गॅस दर वाढीच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन करण्यात आले. महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सुस्मिता जाधव यांनी बहे येथील कोंडाबाई बंडगर यांच्या घरासमोर चुलीवर जेवण करत केंद्र सरकारच्या गॅस वाढीचा जाहीर निषेध केला. महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मार्ग दर्शनाखाली संपूर्ण राज्यात हे गॅस दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले.
सौ. सुस्मिता जाधव म्हणाल्या, केंद्र सरकारने सध्या एकदम पंचवीस रुपयांची दर वाढ केली आहे. या जाचक दर वाढीचा आम्ही महिलांच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. केंद्र सरकारने अनेक कुटुंबांना वाजतगाजत उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस सिलेंडर दिली. मात्र, केंद्र सरकार सातत्याने दर वाढ करत असल्याने या कुटुंबांना सिलेंडर भरून आणणे परवडत नसल्याने या महिला पुन्हा चुलीवर जेवण करत आहेत. आज महागाईमुळे जगणे मुस्किल झाले असताना, केंद्राने सारखी गॅस दरवाढ करणे म्हणजे सामान्य कुटुंबांची थट्टा आहे.
राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा पाटील, तालुका सरचिटणीस अलका माने, उपाध्यक्ष वैशाली पाटील, सदस्या रेखा पवार, कोंडाबाई बंडगर, शैला अंबी, जयबून शेख, अनिता उगारे, अस्मिता आवळेकर, राजश्री घोडके, सरिता सलगर, सरिता घोडके, राणी चव्हाण, सविता अंबी यांच्यासह महिला या अनोख्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या.