रत्नागिरी/प्रतिनिधीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार नारायण राणे यांचे तोंडभरुन कौतुक केले. ग्रामपंचायत निवडणुकीतही राणे यांनी भा...
रत्नागिरी/प्रतिनिधीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार नारायण राणे यांचे तोंडभरुन कौतुक केले. ग्रामपंचायत निवडणुकीतही राणे यांनी भाजपला रत्नागिरी-सिंधुदुर्गात चांगले यश मिळवून दिले आहे. त्यामुळे शाह हे राणे यांच्यावर खूश झाले असून त्यांची केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.
राणे यांच्या ’लाइफटाइम’ या मेडिकल कॉलेजच्या उदघाटनासाठी शाह सिंधुदुर्ग दौर्यावर आले होते. या वेळी उपस्थितांना संबोधित करताना शाह यांनी राणे हे अतिशय मेहनती आणि अन्यायाचा प्रतिकार करणारे नेते असल्याचे म्हणत त्यांच्या कामांचे कौतुक केले. राणे हे जिथे अन्याय होतो, तिथे निडरपणे संघर्ष करतात. जो स्वत:वरील अन्यायाविरोधात लढू शकत नाही, तो जनतेसाठीदेखील लढू शकत नाही. राणे हे अन्यायाचा प्रतिकार करणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द वळणावळणाची राहिली आहे; पण राणे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होणार नाही याची मी ग्वाही देतो. राणे यांच्यासारख्या नेत्यांना कसे सांभाळायचे हे भाजपला चांगले समजते, असे शाह म्हणाले. शाह यांनी या विधानातून राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाण्याचे संकेत दिल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, सिंधुदुर्गात आयोजित कार्यक्रमात शाह यांच्यासोबत राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपचे इतर महत्वाचे नेते उपस्थित होते.