मुंबई : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य शिवस्मारक उभारलं जाणार आहे. मात्र स्मारक अरबी समुद्रात असल्याने लोक शिवस्मारकापर्यंत ...
मुंबई : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य शिवस्मारक उभारलं जाणार आहे. मात्र स्मारक अरबी समुद्रात असल्याने लोक शिवस्मारकापर्यंत पोहोचणार कसे ? यावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार चाचपणी करत आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी भुयारी रेल्वेच्या पर्यायाची देखील तपासणी केली जात आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
शिवस्मारक पोहोचायला काय पर्याय आहेत हे तपासावे लागेल. तिथे 12 महिने बोटीने जाणे शक्य होणार नाही. पावसाळ्यात समुद्र उफळलेला असतो, त्यावेळी तिथे बोट जाऊ शकत नाही. 12 महिने वाहतूक करायची असेल तर काय पर्यायी व्यवस्था करायची याचा विचार सुरू आहे. भुयारी रेल्वे होऊ शकेल का याची तपासणी देखील सुरु आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं. शिवस्मारकाची जागा राजभवनापासून 1.2 किमी, गिरगाव चौपाटीपासून 3.6 किमी आणि नरिमन पॉइंटपासून 2.6 किमी अंतरावर आहे. 6.8 हेक्टर बेटावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 210 मीटर उंचीचा पुतळा असणार आहे. हा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा ठरणार आहे. तीन निविदांपैकी सर्वात कमी असलेली 'एल अँड टी' कंपनीची 3 हजार 826 कोटी रुपयांची निविदा पात्र ठरली. हा प्रकल्प 2 हजार 500 कोटी रुपयांचा असून त्यामध्ये जीएसटी धरण्यात आलेला नाही. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 36 महिन्यांचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे. शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार बनवणार आहेत.