जगात कोरोनाची दुसरी लाट आली; परंतु ती आपल्याकडं आली नाही, याची आपण किती पाठ थोपटून घेतली; परंतु ती किती चुकीची होती, हे आता दिसायला लागलं आह...
जगात कोरोनाची दुसरी लाट आली; परंतु ती आपल्याकडं आली नाही, याची आपण किती पाठ थोपटून घेतली; परंतु ती किती चुकीची होती, हे आता दिसायला लागलं आहे. कोरोनाचं प्रमाण कमी झालं. याचा अर्थ आपण कोरोनाला या जगातूनच हरविलं, असा करून घेतला आणि जणूकाही आता कोरोना आपल्या जवळपासही फिरकणार नाही, असा समज आपण करून घेतला. त्यातून कोरोनाविषयक नियमांची पायमल्ली करण्याचा पदोपदी विडाच उचलल्यासारखं आपण वागू लागलो आणि कोरोनाला पुन्हा निमंंत्रण दिलं.
कोरोनाची भीती संपली, की काय होतं, हे सध्या जग अनुभवतं आहे. भारतही त्याला अपवाद नाही. आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याला आपण सर्वंच जबाबदार आहोत. टाळेबंदी शिथील केली, थोडी मोकळीक दिली, तर लोक लगेच कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून वागायला लागले. गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी लावायचे लोक विसरले. नऊ-दहा हजार रुग्ण सापडणार्या राज्यांत दोन-तीन हजारांच्या आत रुग्ण सापडत होते. कोरोनामुळं होणार्या मृत्यूचं प्रमाण घटलं होतं. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97 टक्क्यांहून अधिक झालं होतं. असं असलं, तरी मुख्यमंत्र्यांसह सर्वंच नेते धोक्याचा इशारा देत होते; परंतु ते कोणीच मनावर घेत नव्हतं. बंदीवासातून जणू आपली सुटका झाली, अशा भ्रमात राहून लोक स्वैराचारी पद्धतीनं वागायला लागले. कोरोनाचं संकट संपलं नसताना नियम धाब्यावर बसवून यात्रा, जत्रा, लग्न मोठ्या धामधुमीत करायला लागले. इतर लोकांचं एकवेळ बाजूला ठेवलं, तरी स्वतःला कोरोनापासून वाचविण्यासाठी मुखपट्टी, सामाजिक अंतर भान आणि सॅनिटायझरचा वापर करणं आवश्यक आहे; परंतु कोरोनाचं लसीकरण एकीकडं चालू असताना आता आपल्याला कोरोना गाठूच शकणार नाही, असा फाजील आत्मविश्वास निर्माण झाल्यानं स्वैराचाराची जणू परवानगी मिळाल्याच्या थाटात लोक वावरायला लागले. त्याचा परिणाम महाराष्ट्रात गेल्या चार दिवसांपासून सातत्यानं चार हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. एकूण चाचण्यांच्या संख्येत दहा टक्के जणांना बाधा झाल्याचं आढळलं आहे. मुंबईसह विदर्भात कोरोना बाधितांची संख्या जास्त वाढतं आहे. आता कोरोनाचा केंद्रबिंदू ग्रामीण भागात सरकला आहे. कोरोनाची प्रकरणं अचानक वाढल्यानं आता रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही घटलं आहे. रिकव्हरी रेट 95 टक्क्यांच्या खाली आला आहे. परिणामी उपचार घेणार्या रुग्णांची संख्या वाढली आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या चौदा दिवसांत तीन हजार 154 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या पाच दिवसांची आकडेवारी पाहिली तर, दहा फेब्रुवारीला 315, 11 फेब्रुवारीला 359, 12 फेब्रुवारीला 369, 13 फेब्रुवारीला 376 आणि 14 फेब्रुवारीला 399 रुग्ण आढळले आहेत. झोपडपट्टीपेक्षा मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू वस्तीतच जास्त आहे. एक फेब्रुवारीला अमरावतीतील पॉझिटिव्ही रेट म्हणजे संक्रमित रुग्णांचं प्रमाण 22 टक्के होते, जे 56 टक्क्यांवर गेलं आहे. नागपुरात मागील पाच दिवसांत दररोज चारशेपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून येत आहे. नागपुरात कोरोनाचे नऊ अतिसंक्रमित क्षेत्रे तिथं कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतं आहे. अमरावती, नागपूरशिवाय यवतमाळ, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांमध्येही कोरोना बाधितांची संख्या सातत्यानं वाढतं आहे. दिल्लीच्या केंद्रीय पथकानं 10 ते 14 जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं नमूद केलं. ज्यात अमरावती, अकोला याबद्दल विशेष चिंता व्यक्त केली आहे. काही ठिकाणी सरळ आकडेवारी पाहण्यापेक्षा दशलक्ष लोकसंख्येपैकी किती याचा विचार व्हायला हवा. या ठिकाणी चाचण्यांचं प्रमाण वाढवलं पाहिजे आणि उपचारातील प्रोटोकॉलमध्येही सुधारणा करून त्याबाबत अधिक प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
नागरिकांचा हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा भोवतो आहे. प्रवासाला मंजुरी देण्यात आली आहे, त्यामुळं लोक सगळीकडं बिनधास्त फिरत आहेत; पण त्याचवेळी कोरोनासंबंधी नियमांचं पालन करणं बंधनकारक असताना, ते मात्र कुणी पाळताना दिसत नाही. कोरोना रोखण्यासाठी मुखपट्टी आणि सामाजिक अंतर भान बंधनकारक आहे; पण मुखपट्टी न घालताच लोक बिनधास्तपणे फिरत आहेत. बाजारात जातानाही मुखपट्टी लावली जात नाही, हे कोरोना वाढण्याचं कारण असल्याचं केंद्रीय पथकानं नमूद केलं आहे. गेल्या वर्षी लोकांनी अगदी साधेपणानं आपली लग्न आटोपली आहेत. काही जणांनी ऑनलाईन पद्धतीनं लग्न केलं. त्यानंतर लग्न समारंभात 50 लोकांना परवानगी देण्यात आली होती. सुरुवातीला या नियमाची अंमलबजावणी झाली; पण आता हा नियम सर्रासपणे धाब्यावर बसवला जातो आहे. शेकडो, हजारो लोकांना लग्नाचं आमंत्रण दिलं जात आहे आणि या लग्न समारंभातही लोकांच्या चेहर्यावर मुखपट्टी नसते. त्यात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत आणि जानेवारीत ग्रामपंचायत निवडणुकाही झाल्या. या सर्व गोष्टी कोरोनाला हातपाय पसरण्याची मुभा देणार्या ठरल्या. अनलॉकनंतर अमरावती जिल्ह्यातील नागरिक बिनधास्त झाले आहेत. त्यामुळं कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतं आहे. त्यामुळं प्रशासनाला नाईलाजास्तव जिल्ह्यात संचारबंदी जाहीर करावी लागलेली आहे. ज्या भागात रुग्ण वाढत आहेत, त्या भागात चाचण्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. कोरोनाबाबत नियम पाळले जात नाहीत, हे दुर्दैवी आहे. जर नियम पाळले जात नसतील, तर पुन्हा टाळेबंदीला सामोरं जावं लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना पुन्हा हात-पाय पसरेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यात महाराष्ट्रातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यानं आपल्याकडंही पुन्हा टाळेबंदी लागू करणार का, याबाबत शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात पुण्यासारख्या जिल्ह्यांत चाचण्या होणार्यांपैकी दहा टक्के लोकांना कोरोनाची बाधा होत असल्याचं आकडेवारी सांगते.
देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू झालं आहे. 13 फेब्रुवारीपासून लसीचा दुसरा डोसही देणं सुरू झालं आहे. ज्यांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला त्यांना दुसरा डोस दिला जातो आहे; पण आता दुसरा डोस देणं सुरू होताच धक्कादायक माहिती समोर आली आहे. पहिला डोस घेतलेल्या लोकांपैकी फक्त चार टक्के लोकच कोरोना लसीचा दुसरा डोस घ्यायला आले. विशेष म्हणजे पहिला डोस घेतल्यानंतर काहींना कोरोना संक्रमण झालं आहे आणि लसीचा दुसरा डोस घेतल्याशिवाय लसीचा प्रभावही दिसणार नाही. सरकारनं दिलेल्या आकडेवारीनुसार 16 जानेवारीला एक लाख 91 हजार 181 लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. चार आठवड्यांनंतर म्हणजे 13 फेब्रुवारीला शनिवारी संध्याकाळी सहापर्यंत फक्त सात हजार 668 आरोग्य कर्मचार्यांना दुसरा डोस देण्यात आला. म्हणजेच दुसरा डोस घेण्यासाठी फक्त चार टक्के लोक पोहोचले. डॉक्टरांनी सांगितलं की, लसीचा दुसरा डोस घेतल्याशिवाय त्याचा प्रभावही दिसून येणार नाही. लसीचा एक डोस घेतल्यानंतर काही लोक कोरोना संक्रमितही झाले आहेत. अशाच कोरोनाचा दुसरा डोस घेणार्यांची संख्या घटली आहे. त्यामुळं चिंता वाढली आहे. मोदी सरकार टप्प्याटप्प्यानं कोरोना लसीकरण मोहीम राबवत आहे. 30 कोटी लोकांना लस देण्याचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी तीन गट तयार करण्यात आले आहेत. पहिल्या गटात एक कोटी आरोग्य कर्मचारी, दुसर्या गटात दोन कोटी फ्रंटलाइन वर्कर्स आणि इतर 27 कोटी 50 पेक्षा जास्त वयाच्या सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे. ज्यामध्ये ज्येष्ठ आणि इतर आजार असलेले नागरिक असतील.
पहिल्या आणि दुसर्या डोसमध्ये चार आठवड्यांचं अंतर ठेवण्यात आलं आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत सर्व आरोग्य कर्मचार्यांना लसीचा पहिला डोस घेणं बंधनकारक आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत आरोग्य कर्मचार्यांना लसीचा पहिला डोस घेता येणार आहे. यानंतर 21 ते 25 फेब्रुवारी पाच दिवस मॉप अप राऊंड होईल. ज्यांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला नाही, त्यांना या पाच दिवसांत घेता येऊ शकतो. आरोग्य कर्मचार्यांना लसीचं वेळापत्रक आणि त्याचं महत्त्व चांगलंच कळतं. असं असलं, तरी हेच कर्मचारी लसीचा दुसरा डोस घेण्याकडं हे पाठ फिरवित असतील, तर पुढच्या महिन्यापासून सामान्य नागरिकांना जेव्हा लसीचा पहिला डोस दिला जाईल आणि दुसरा डोस देण्याची वेळ येईल, तेव्हा हे लोक डोस घ्यायला येतील, तेव्हा त्यांचं येणं सुुनिश्चित करावं लागेल.