संगमनेर/प्रतिनिधी : साकुर येथे मातीमिश्रीत वाळू उत्खनन परवानगीच्या नावाखाली मुळा नदी पात्रातूनच फेब्रुवारी 2020 मध्ये दिवस रात्र वाळू उपसा स...
संगमनेर/प्रतिनिधी : साकुर येथे मातीमिश्रीत वाळू उत्खनन परवानगीच्या नावाखाली मुळा नदी पात्रातूनच फेब्रुवारी 2020 मध्ये दिवस रात्र वाळू उपसा सुरु होता. त्याबाबत स्थानिक साकुर गावातील काही शेतकरी बांधवानी माझ्याकडे तक्रार केल्यानंतर वाळू उपसाचे पुरावे मी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी संगमनेर यांच्याकडे देऊन कारवाईची मागणी केली होती, तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून याविरोधात आवाज उठविला होता.
स्थानिक महसूल कडून करवाई होत नसल्यामुळे अमोल खताळ यांनी विभागीय आयुक्त, नाशिक व जिल्हाधिकारी, नगर यांना कल्पना देऊन कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर तहसिलदार, संगमनेर यांनी परवानातील अटी व शर्थीचा भंग केला म्हणून उत्खनन तात्काळ बंद करून स्थानिक तलाठी व मंडल अधिकारी यांनी पंचनामा करण्यास सांगितले होते. त्यानुसार 100 ब्रासचा पंचनामा केला होता. त्या अनुषंगाने तहसिलदार यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1948 मधील कलम 48(7) व (8) नुसार 40 लाखचा दंडात्मक आदेशाची नोटीस अजिज चौगुले यांना 25 फेब्रुवारी 2020 रोजी पाठवून 7 दिवसात लेखी खुलासा मागितला होता. चौगुले यांनी मह्सुलने पाठविलेल्या नोटीसीला केराची टोपली दाखवली होती. याप्रकरणी एका राजकीय पक्षाच्या नेत्याने खताळ यांना त्यावेळी जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. त्यावेळेस याबाबत खताळ यांनी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा सुद्धा दाखल केला होता. माती मिश्रित वाळू, अवेध वाळूच्या माध्यमातून कमविलेला पैशाचा वापर हा ग्रामीण भागात निवडणुका, फ्लेक्स बाजी, दादागिरी यामध्ये मोठ्या प्रमाणात संगमनेर तालुक्यात होऊ लागलेला आहे. सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या आशीर्वादामुळे मुळा-प्रवरा नदी पात्रातून कार्यकर्त्यांना वाळू तस्करीसाठी ताकद दिली जात आहे. कोविड महामारीमुळे या दंडात्मक कारवाईला ब्रेक लागला होता. परंतु खताळ यांनी याबाबत लेखी तसेच वेळोवेळी प्रत्यक्ष तहसीलदार यान भेटून दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी पाठपुरावा केला. चौगुले दंड रक्कम भरत नसल्यामुळे त्यांची संपत्ती जप्त करण्याची मागणी नोव्हेंबर 2020 मध्ये केली होती. त्यानुसार तहसीलदार संगमनेर यांनी अनधिकृत खनिज उत्खनन बाबत साकुर येथील गट नं. 122/2 क्षेत्र 35 आर पोट खराब 17 आर या 7/12उतार्यावर जमीन जप्तीची कारवाई केली. तहसीलदार यांनी केलेल्या कारवाईचे खताळ यांनी समाधान व्यक्त केले. संगमनेर येथील वाळू तस्करी थांबली नाही तर भविष्यात याविरोधात मोठे जन आंदोलन उभे करणार असल्याचे खताळ यांनी सांगितले.