नवी दिल्ली, राज्यसभेतील काँग्रेस खासदार गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यांच्या सन्मानार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी...
नवी दिल्ली, राज्यसभेतील काँग्रेस खासदार गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यांच्या सन्मानार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासह अनेक खासदारांनी गुलाम नबी आझाद यांच्या समारोपाचे भाषण केले. यानंतर आझाद यांची बोलण्याची वेळ आली, तेव्हा ते भावुक झाले. ते म्हणाले, की मी भाग्यवान आहे, की मी पाकिस्तानात गेलो नाही आणि मला हिंदुस्तानी मुसलमान असल्याचा अभिमान आहे. ते पुढे असेही म्हणाले, की समाजात ज्या वाईट बाबी आहेत, त्या हिंदुस्तानी मुसलमानांमध्ये नाही.
यादरम्यान जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करीत ते भावुक झाले. आझाद म्हणाले, की मी जम्मू-काश्मिरातील सर्वांत मोठ्या एसपी कॉलेजातून शिकलो. येथे 14 ऑगस्ट (पाकिस्तानचा स्वातंत्र दिन) देखील साजरा करीत होतो आणि 15 ऑगस्टदेखील. तेथे 14 ऑगस्ट साजरा करणार्यांची संख्या जास्त होती आणि जे लोक 15 ऑगस्ट साजरा करीत होते, त्यात मी आणि माझे मित्र होते. आम्ही प्राचार्य आणि स्टाफसोबत राहत होतो; मात्र यानंतर आम्ही 10 दिवस शाळेत जात नव्हतो, कारण आम्हाला यानंतर मार खावा लागत होता. मात्र मी त्यातून बाहेर पडलो आहे. मला आनंद आहे, की जम्मू - काश्मीरच्या अनेक पक्षांच्या नेतृत्वात जम्मू-काश्मीरचा विकास झाला. मला नेहमीच असे वाटते, की मी भाग्यवान आहे. कारण मी जन्नत म्हणजे हिंदुस्तानात राहतो. माझा जन्म स्वातंत्र्य झाल्यानंतर झाला; मात्र जेव्हा यूट्यूबवर तेव्हाची परिस्थिती पाहतो किंवा पुस्तकात तो काळ वाचतो, तेव्हा असे वाटते, की मी पाकिस्तानला गेलो नाही हे चांगलेच होते. जेव्हा पाकिस्तानमधील परिस्थिती पाहतो, तेव्हा मला मी हिंदुस्तानी मुसलमान असल्याचा अभिमान आहे. आज जगातील कोणत्या मुसलमानाने अभिमान बाळगाला हवा, तर तो हिंदुस्तानातील मुसलमानाला व्हायला हवा, असे सांगताना आझाद भावनावश झाले होते.