सांगली / प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे भुईकोट किल्ल्यावर शिराळा विधानसभेचे विद्यमान आ. मानसिंगराव नाईक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन...
सांगली / प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे भुईकोट किल्ल्यावर शिराळा विधानसभेचे विद्यमान आ. मानसिंगराव नाईक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन किल्ल्याची पाहणी केली.
येथील तोरणा भुईकोट किल्ल्याचा राज्य शासन पर्यटनदृष्ट्या विकास करणार आहे. त्याबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार आ. मानसिंगराव नाईक व आर्किटेक्ट प्रमोद चौगुले सांगली यांनी भुईकोट किल्लाची पाहणी केली. किल्ल्याचे एकूण क्षेत्र, उपलब्ध जागा, तटबंदी, कोटेश्वर मंदिर, विहीर व त्यातील भुयारी मार्ग, पूर्वीच्या इमारतींचे भग्नाअवशेष व त्यांचे महत्व यांची पाहणी केली. यावेळी तटबंदी दुरुस्ती, छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा, महाराजांना संगमेश्वरला अटक झाली. तेथून त्यांचा झालेला प्रवास. शिराळा येथे त्यांना सोडवण्यासाठी मराठ्यांनी केलेला प्रयत्न याचे रेखाचित्र असलेले स्मारक, जवळच असलेलं शिवकालीन भवानीमाता मंदिराचा विकास व एकूणच पर्यटनदृष्ट्या आणखी जे काही करणे शक्य आहे, त्या गोष्टीचा समावेश या विकासात असेल. ज्या इमारती उभारल्या जातील, त्या पुरातन धर्तीवर दगडाच्या असतील. जेणेकरून पर्यटकांना इतिहास काळातील अनुभूती येईल, असा प्रयत्न राहील, असे आ. नाईक यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत नगराध्यक्षा सुनीता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी, युवा नेते विराज नाईक, नगरसेवक विश्वप्रताप नाईक, मोहन जिरंगे, राजू निकम, बसवेश्वर शेटे, प्रमोद पवार, बांधकाम विभागाचे उपअभियंता अतुल केकरे उपस्थित होते.