जगाच्या कोणत्याही कोपर्यात घडलेली घटना आता त्या कोपर्यापुरती मर्यादित राहत नाही. एखाद्या देशात घडलेल्या घटनाचे पडसाद इतर देशांत उमटतात. एख...
जगाच्या कोणत्याही कोपर्यात घडलेली घटना आता त्या कोपर्यापुरती मर्यादित राहत नाही. एखाद्या देशात घडलेल्या घटनाचे पडसाद इतर देशांत उमटतात. एखाद्या देशाच्या अंतर्गत प्रश्नांत दुसर्या देशाने हस्तक्षेप करणे हा बाह्य हस्तक्षेप होतो; परंतु एखाद्या देशात घडलेल्या घटनांवर दुसर्या देशातील सामान्य नागरिकांनी भाष्य करणे हा दुसर्या देशाच्या अंतर्गत प्रश्नांत हस्तक्षेप होत नाही. सेलिब्रिटींना परराष्ट्र व्यवहारातील हे बारकावे लक्षात येत नाहीत. अमेरिकेत पोलिसांनी केलेल्या हल्ल्यात एक कृष्णवर्णीय ठार झाला. त्याचे पडसाद जगात उमटले. भारतातही मोर्चे निघाले. ब्लॅक पँथर चळवळ सुरू झाली. ब्रिटनमध्ये तर मोठे आंदोलन उभे राहिले. या पार्श्वभूमीवर भारतातील शेतकर्यांच्या आंदोलनाच्या जगभरातून प्रतिक्रिया उमटणार नाही, ही अपेक्षा धरणे चुकीचे आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला काही आंतरराष्ट्रीय मान्यवरांनी पाठिंबा दिला. त्यामध्ये स्वीडनमधील किशोरवयीन पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिच्यासह पॉप गायिका रिहाना, अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची मीना यांच्यासहित अनेक लेखक, कवी, विचारवंतांचा समावेश आहे.
त्यातील काहींनी यापूर्वी अन्य देशांतील चुकीच्या घटनांवर आवाज उठविला. त्यांना जागतिक पुरस्कार मिळाले. अशा व्यक्तींच्या एखाद्या टिप्पण्णीने एवढे घाबरून जाण्याचे काहीच कारण नव्हते. त्याचे भान आपल्याकडील सेलिब्रिटींना असायला हवे होते. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, गौतम गंभीर, ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्यासह अनेक कलाकार, खेळाडूंनी ट्विटच्या माध्यमातून परदेशातील सेलिब्रिटींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. राजकारणाच्या चिखलाच दगड फेकला, तर अंगावर चिखल उडणारच. तसा तो सेलिब्रिटींच्या अंगावर उडाला. तेंडूलकरच्या प्रतिमेला काळे फासण्याचे आंदोलन करण्यात आले. ते चुकीचे आहे; परंतु अगोदर सेलिब्रिटींनी दिलेल्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया उमटणारच. या देशातील लाखो शेतकरी शेतीमालाच्या किमतीचा आपल्या जीवनमरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी डिसेंबर-जानेवारीच्या अंग गोठवणार्या थंडीमध्ये दिल्लीच्या सीमेवर सुमारे सत्तर दिवस आंदोलन करतात. त्यामध्ये साठ-सत्तर वर्षांच्या वृद्ध महिला भाग घेतात. या आंदोलनामध्ये आतापर्यंत सुमारे 70-80 आंदोलक मरण पावतात. सरकार त्यांची सर्व बाजूंनी नाकेबंदी करते, या गोष्टी आपल्याकडील ’तथाकथित’ सेलिब्रिटींना गंभीर वाटू नये, हे त्यांच्या संवेदना गोठल्याचे निदर्शक असल्याचे डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी म्हटले आहे. शेतकर्यांची भूमिका चुकीची वाटू शकते व सरकारच्या बाजूने उभे राहण्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे; परंतु सरकार व आंदोलक शेतकर्यांनी सध्याच्या कठीण काळात लवकरात लवकर तोडगा काढणे, हे देशाच्या हिताचे आहे. इतकीही संतुलित व समंजस भूमिका हे ’तथाकथित’ सेलिब्रिटी घेऊ शकत नाहीत? असा प्रश्नही डॉ. मुणगेकर यांनी उपस्थित केला. देशाचे ’खरे’ सेलिब्रिटी कोण, हे आपण भारतीयांनी ठरवण्याची हे वेळ आली आहे. या देशातील कोट्यवधी रुपयांची संपत्ती असलेले, आपापल्या निवडक क्षेत्रात यश संपादन करणारे की या सर्व क्षेत्रांमध्ये स्वत:च्या शारीरिक श्रमांवर या देशाची उभारणी करणारे श्रमिक आणि आपले शीर तळहातावर घेऊन देशाच्या सीमांच्या संरक्षण आपले सैनिक, असाही प्रश्न डॉ. मुणगेकर यांनी उपस्थित केला. भारतरत्न लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर आणि अन्य काही सेलिब्रिटींनी ट्वीटरवर व्यक्त केलेली मते सध्या चर्चेत आहेत. त्यावर राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केले. राज यांनी सचिन, लतादीदी तसेच सेलिब्रिटींना दोष न देता यासाठी केंद्रातील भाजप सरकारला दोषी ठरवले. सरकारला त्यांनी खरमरीत शब्दांत सल्लाही दिला. ’आपल्या एखाद्या धोरणासाठी भारत सरकारने भारतरत्नांची प्रतिष्ठा पणाला लावू नये. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर ही माणसे दिग्गज आहेत; पण साधी आहेत. आपल्या भारत सरकारने सांगितले, म्हणून त्यांनी ट्वीट केले; पण आज सर्व रोषाला त्यांनाच सामोरे जावे लागते. सरकारने अशी घोडचूक पुन्हा करू नये’, अशा शब्दांत राज यांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला. एखादे देशांतर्गत आंदोलन चिघळले, म्हणून आपली बाजू सावरून घेण्यासाठी सत्ताधार्यांनी भारतरत्नांना ट्वीट करायला सांगणे चुकीचेच आहे, असेही राज पुढे म्हणाले. राज ठाकरे आणि खा. संजय राऊत यांचे पराकोटीचे मतभेद आहेत. तरीही सेलिब्रिटींच्या ट्वीटवरून त्यांनी व्यक्त केलेल्या मतांत कमालीचे साम्य आहे. पॉपस्टार रिहानाच्या एका ट्वीटने या संपूर्ण वादाची सुरुवात झाली आहे. त्यावरूनही राज यांनी निशाणा साधला. ’रिहानाने एक ट्वीट केले, तर सर्व आगपाखड करतायत आणि म्हणतात, की आमच्या देशाचा प्रश्न तू नाक खुपसू नको मग अमेरिकेत जाऊन ’अगली बार ट्रम्प सरकार’ म्हणत जाऊन भाषणेही करायची काहीही गरज नव्हती, तोही त्यांच्या देशाचा प्रश्न होता, असा सणसणीत टोला राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय सेलिब्रिटींना वडीलकीचा सल्ला दिला आहे. ‘आपले क्षेत्र सोडून इतर क्षेत्राबद्दल कोणतेही विधान करताना किंवा व्यक्त होताना काळजी घ्यावी,’ असा सल्ला पवार यांनी सचिन तेंडुलकरसह सर्वच ‘सेलिब्रेटीं’ना दिला. शेतकरी आंदोलनावरून सुरू असलेल्या वादात सचिनने ट्वीट करत उडी घेतल्याने त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी सचिनला काळजी घेण्याचीही सूचना केली. ‘सचिन आणि लताबाईंनी जे ट्वीट केले, त्यावर सामान्य माणसांनी अत्यंत तीव्र शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिल्या. हे टाळण्यासाठी आपले क्षेत्र सोडून एखाद्या दुसर्या क्षेत्राबद्दल बोलणार असू, तर अधिक काळजी घेतली पाहिजे,’ असे पवार म्हणाले. पॉपस्टार रिहाना हिने सातासमुद्रापलीकडून शेतकरी आंदोलनास पाठिंबा देताच येथे अनेकांना मिरच्या झोंबल्या. परदेशातील लोकांनी येथील कलाकारांचे कौतुक केलेले चालते; पण लढणार्या शेतकर्यांयांचे कौतुक केले हा आपल्या देशातील हस्तक्षेप वाटतो. आता रिहानाच्या समर्थनासाठी जे उभे राहतील त्यांना ’देशद्रोही’ ठरवले जाईल, अशा शब्दांत खा. राऊत यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. परदेशातील कलाकारांनी शेतकरी आंदोलनाबाबत ट्वीट करताच भारतात कलाकारांमध्येही दोन गट पडल्याचे चित्र आहे. काही कलाकारांनी शेतकरी आंदोलन हा आमच्या देशाचा अंतर्गंत प्रश्न असून बाहेरच्यांनी बोलू नये अशी भूमिका घेतली आहे. तर, काही कलाकारांनी रिहानाच्या ट्विटला समर्थन दिले आहे. जगभरातून शेतकरी आंदोलनास पाठिंबा मिळत आहे. पॉपस्टार रिहाना हिने दिल्लीतील शेतकर्यांच्या आंदोलनास पाठिंबा देताच मोदी यांच्या भक्तांत एकच खळबळ उडाली. स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस या उघडपणे शेतकर्यांच्या समर्थनासाठी उतरताच अक्षय कुमार, कंगना राणावत, सचिन तेंडुलकरपासून ते लता मंगेशकरपर्यंत सर्व ’सेलिब्रिटीं’ नी अचानक आपली मते समाजमाध्यमांवर व्यक्त केली. गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी एकाकी झुंज देत आहेत. त्यावर साध्या संवेदनाही या प्रमुख मंडळींनी व्यक्त केल्या नाहीत. म्हणजेच आंतरराष्ट्रीय पाठिंबा शेतकर्यांना मिळू लागताच, सरकारने त्यांच्या विरोधात या ’सेलिब्रिटीज’ ना उतरवले, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे.