सातारा / प्रतिनिधी : सातारा तालुक्यात कृषी-औद्योगिक विकासाबरोबरच हरीत क्रांती घडवून आणण्यासाठी आदरणीय स्व. श्री. छ. अभयसिंहराजे तथा भाऊसाहे...
सातारा / प्रतिनिधी : सातारा तालुक्यात कृषी-औद्योगिक विकासाबरोबरच हरीत क्रांती घडवून आणण्यासाठी आदरणीय स्व. श्री. छ. अभयसिंहराजे तथा भाऊसाहेब महाराज यांनी अथक परिश्रम घेतले. सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुख:त एकरुप होवून त्यांनी आपल्या रयतेशी अखंडपणे जिव्हाळ्याचे नाते जपले. त्यांचे कृपाछत्र आपणा सर्वांवर वटवृक्षाप्रमाणे सदैव राहिले असून त्यांच्या अमूल्य स्मृती जपत त्यांच्या समाजाभिमुख विकासकार्याचा आदर्श आपण पुढे चालवीत आहोत, असे प्रतिपादन अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सातारा तालुक्याचे भाग्य विधाते, अजिंक्य उद्योग समुहाचे शिल्पकार व अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी सहकारमंत्री स्व. श्री. छ. अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या 17 व्या स्मृतीदिनानिमीत्त अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित अभिवादनाच्या कार्यक्रमप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्वास शेडगे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती श्रीमती वनिता गोरे, राजू भोसले, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रा. शिवाजीराव चव्हाण, प्रतिक कदम, अनिल देसाई, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर, सदस्या सौ. छाया कुंभार, माजी सभापती धर्मराज घोरपडे, जितेंद्र सावंत, आशुतोष चव्हाण, आनंदराव कणसे, राहूल शिंदे, दयानंद उघडे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कारखाना कार्यस्थळावरील स्व. भाऊसाहेब महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार, पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, अजिंक्य उद्योग समुहाचे संस्थापक, महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री असलेल्या भाऊसाहेब महाराजांनी सातारा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडूण आल्यानंतर अनेक प्रकारे विकासाची महत्वपूर्ण कामे केली. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने त्यांनी या भागाच्या विकासाचा ध्यास घेवून चौफेर विकास साधला. अल्पावधीतच त्यांनी उभे केलेले विकासाचे विश्व पाहिले की, भलेभले आश्चर्यचकीत होतात. आजही त्यांच्या सुसंस्कृत राजकारणाचे उदाहरण आवर्जून दिले जाते. सातारा शहरामध्ये सन 1993 मध्ये झालेल्या साहित्य संमेलनामुळे तर संपुर्ण साहित्य चळवळ भारावून केली होती, हे एक जागते उदाहरण आहे. साहित्य संमेलनाचे नेटके आयोजन व नियोजन करुन त्यांनी साहित्य क्षेत्रात राजसत्तेची ताकद उभी केली होती. त्यामुळेच त्यांचा आजही जाणता राजा म्हणून उल्लेख केला जातो.