पुणे/प्रतिनिधी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्यावतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा जाहीर निषेध करण्यात आला. अभा...
पुणे/प्रतिनिधी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्यावतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा जाहीर निषेध करण्यात आला. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थापन परिषदेच्या सभेमध्ये घुसून आंदोलन केले आणि घोषणाबाजी केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्यावतीने व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये कोणत्याही विद्यार्थी हिताच्या विषयांवर चर्चा नाही, असा आरोप करण्यात आला.
गेले सहा महिने परीक्षा शुल्क परत करण्यासाठी विद्यार्थी आंदोलन करीत आहे. त्यावर अजून कोणताही निर्णय नाही. विद्यापीठाच्या स्वायत्तत्तेवर शासनाकडून गदा आणली जात आहे आणि विद्यापीठ यावर गप्प आहे, अशी टीका अभाविपने केली. विद्यार्थ्यांच्या पैशांवर राजकीय कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, असा आरोप या वेळी करण्यात आला. पुणे विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षेच्या पूर्वी विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याचा कोणताही निर्णय घेतला नाही. परीक्षा शुल्क परत करण्याविषयी या बैठकीत निर्णय करावा अन्यथा ही बैठक करण्याचा अधिकार नाही, अशी टीका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली. यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने परीक्षांमध्ये येणार्या अडचणींवरुन केलेले पुंगी बजाव आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.