अहमदनगर/प्रतिनिधी: जे नेते शरद पवार यांच्यावर आक्षेप घेऊन टीका करीत आहेत. त्यांची वैचारिक पात्रता काय, असा सवाल करत ज्या नेत्याने संसदीय ...
अहमदनगर/प्रतिनिधी: जे नेते शरद पवार यांच्यावर आक्षेप घेऊन टीका करीत आहेत. त्यांची वैचारिक पात्रता काय, असा सवाल करत ज्या नेत्याने संसदीय राजकारणात 50 वर्षापेक्षा जास्त काळ घालवला आहे त्या नेत्यावर टीका करताना आपण काय बोलले पाहिजे, त्याचे भान भाजप नेत्यांना राहिलेले नाही, असे प्रत्युत्तर आमदार नीलेश लंके यांनी दिले आहे.
जेजुरीतील अहल्याबाई होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनावरुन बराच वाद पाहायला मिळाला. पवार यांच्यासारख्या जातीयवादी नेत्यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होऊ नये, अशी भूमिका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली. तसेच आदल्याच दिवशी त्यांनी पुतळ्याचे अनावरण उरकले. यानंतर यावरुन बरेच राजकारण रंगले. असे असले पवार यांच्या हस्ते मात्र नियोजित अनावरणाचा कार्यक्रम पार पाडला. त्यांचे अनावरण प्रसंगीचे भाषणही चर्चेत राहिले. नव्हे, त्या भाषणावर भाजपच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. जेजुरीतील अहल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी पवार यांच्या एका वक्तव्यावरुन टीका होऊ लागली आहे. याच टीकाकारांना आमदार लंके यांनी सुनावले आहे. राजकीय कारकीर्द पन्नास वर्षे पूर्ण करणार्या पवार यांच्यावर हेतू पुरस्कृत दिशाहीन झालेले लोक टीका करीत आहेत. जेजुरी येथे झालेल्या कार्यक्रमात पवार यांनी जे वक्तव्य केले, त्याचा विपर्यास केला जात असल्याचे लंके यांनी म्हटले आहे. देशाचे नेतृत्व करत असताना त्यांच्याइतका राजकीय, सामाजिक आणि ऐतिहासिक अभ्यास कोणाचाही नाही. जे त्यांच्यावर टीका करतात त्यांची वैचारिक पातळी घसरली आहे, अशी टीका त्यांनी केली. पूजनीय अहल्याबाई होळकरांचा सखोल अभ्यास पवार यांच्याइतका टीकाकारांचा नाही. त्यामुळे राज्यातील सर्व टीकाकारांनी देशाचे नेतृत्व करणार्या व्यक्तीमत्त्वावर हेतू पुरस्कृत आरोप थांबवावेत, असे लंके म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यातून जामखेड तालुक्यातून जिथून राष्ट्रवादीचे रोहित पवार आमदार म्हणून विधानसभेवर जातात, ज्या मतदारसंघातल्या चौंडीला अहल्याबाई होळकर यांचा जन्म झाला, असे वक्तव्य पवार यांनी केले होते. अहल्याबाईंच्या जन्माचे ठिकाण सांगण्याकरिता त्यांनी रोहित पवार यांचे आणि त्यांच्या मतदारसंघाचे नाव घेण्याची खरंच गरज होती का, असा सवाल विचारत त्यांच्या याच वक्तव्यावर धनगर समाजातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.