अहमदनगर/प्रतिनिधीः खर्डा (ता.जामखेड) येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात उत्खननादरम्यान मराठ्यांच्या आरमाराचा खजिना सापडला आहे. या किल्ल्यात मरा...
अहमदनगर/प्रतिनिधीः खर्डा (ता.जामखेड) येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात उत्खननादरम्यान मराठ्यांच्या आरमाराचा खजिना सापडला आहे. या किल्ल्यात मराठे आणि निजाम यांच्यात शेवटची लढाई झाली होती. या लढाईत मराठ्यांनी विजय मिळवला होता. हा ऐतिहासिक ऐवज सापडल्याने आणखी काय काय आढळून येते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या ऐवजामुळे इतिहासाच्या पानात डोकावता येणार आहे. सरदार निंबाळकर यांची ही गढी आहे.
ही बातमी इतिहास प्रेमींना समजताच किल्ल्याच्या दिशेने नागरिकांची रीघ लागली. या संदर्भात पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांनी तात्काळ भेट देऊन हा ऐवज तपासावा आणि ताब्यात घेऊन जतन करावा, अशी मागणी होत आहे. खर्डा (ता. जामखेड)येथे 1745 साली सुल्तानराजे निंबाळकर यांनी भुईकोट किल्ला बांधला आहे. ते शिवभक्त म्हणून परिचित आहेत. त्यांनी खर्डा परिसरात बारा ज्योतिर्लिंगे उभारली आहेत. 1795 मध्ये येथे मराठ्यांशी निजामशाही अखेरची लढाई झाली. या लढाईत निजमांचा पराभव झाला. या लढाईत मराठ्यांनी मोठ्या प्रमाणात तोफगोळ्यांचा वापर केला होता, अशी इतिहासात नोंद आढळते;
मात्र गेल्या पंचवीस वर्षांपासून हा किल्ला अस्तित्वासाठी ’झुंज’ देत होता. अखेरची विजयी लढाई येथे झाल्याने इतिहासप्रेमींच्या सतर्कतेमुळे पुरातत्व विभागाने लक्ष केंद्रित केले. हा किल्ला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केला. राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाने किल्ला दुरुस्ती, सुशोभीकरण व अन्य अनुषंगिक कामासाठी आर्थिक तरतूद केली. येथे किल्ल्याच्या अंतर्गत भिंत्तीच्या लगत उत्खननाचे काम सुरू आहे. हे काम करणार्या कामगारांना अडीचशे तोफगोळे सापडले आहेत. किल्याच्या तटबंदीच्या शेजारी जवळपास तीन प्रकारचे तोफगोळे मिळाले आहेत. उत्खनना दरम्यान मिळालेला हा ऐतिहासिक वारसा जपला जावा; तसेच यापुढे येथील उत्खनन अथवा अनुषंगिक काम करताना आढळणार्या सर्व ऐतिहासिक अवशेषांचे जतन करावे, अशी इतिहास प्रेमींकडून मागणी होत आहे. इतिहासात खर्ड्याच्या लढाईलाही फार महत्त्व आहे. खर्ड्याच्या किल्ल्याचे महत्व लक्षात घेऊन शिर्डीला हैदराबादहून येणार्या भाविकांना तिकडे वळविता येऊ शकते. त्यासाठी किल्ल्यात आणखी काही मनोरंजनात्मक सविधा देण्याचा विचार करावा, अशी मागणी होत आहे.