लोकसभा सभागृहात सरकारचे लक्ष वेधले कराड / प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे आंदोलन करणार्या शेतकर्य...
लोकसभा सभागृहात सरकारचे लक्ष वेधले
कराड / प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे आंदोलन करणार्या शेतकर्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घ्या असा मजकूर लिहिलेला फलक हातात घेऊन व काळा मास्क घालून अन्य खासदारांसोबत उभे राहत केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न खा. श्रीनिवास पाटील यांनी गुरूवारी लोकसभेत केला.
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलन करणार्या शेतकर्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी विरोधी खासदारांनी लोकसभेच्या सभागृहात गुरूवारी केली. यामध्ये साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सुध्दा अन्य सहकार्यांसोबत सहभाग नोंदवत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. हे गुन्हे मागे घ्या, असा मजकूर लिहिलेला फलक हातात घेऊन व काळा मास्क घालून त्यांनी ही मागणी केली.
दिल्लीच्या सीमांवर मागील 70 दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. यात काही शेतकर्यांना जीव गमवावा लागला. या भागात पावसाने हजेरी लावली असून थंडी देखील वाढली आहे. थंड वारे व पाऊसांमुळे शेतकर्यांना जीवघेणा त्रास होऊ नये यासाठी सरकारने यातून लवकरात लवकर मार्ग काढावा, अशी आमची मागणी असल्याचे खा. श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. आंदोलनकर्ते शेतकरी कोणाचे ना कोणाचे तरी भाऊ, पती, पुत्र आहेत. या आंदोलनात महिलाही सहभागी झाल्या आहेत. आपल्याच बांधवांसोबत हा असा दुजाभाव न दाखवता सरकारने यावर लवकर तोडगा काढावा. शेतकर्यांच्या या आंदोलनाला आता जन-आंदोलनाचे स्वरूप आले आहे. शेतकर्यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत सरकारने लवकरात लवकर यावर मार्ग काढावा, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.