चंदीगडः पंजाबमधील जलालाबादमध्ये अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. अकाली दलाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे, की...
चंदीगडः पंजाबमधील जलालाबादमध्ये अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. अकाली दलाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे, की काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यानंतर काँग्रेस व अकाली दलाचे कार्यकर्ते आपसांत भिडले होते. या वेळी तुफान दगड-विटा एकमेकांवर फेकण्यात आल्या, एवढेच नाही तर गोळीबार करण्यात आला.
जलालाबादमध्ये नगर काउन्सिलची निवडणूक होत आहे. काल काँग्रेस व आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आपसात भिडले होते. आज अकाली दलाचा उमेदवार अर्ज दाखल करणार होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी बादल हे तिथे पोहचले होते. बादल यांच्या वाहनांचा ताफा येताच, त्यावर जोरदार दगडफेक सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांनी बॅरिडकेडस् हटवून पळापळ सुरू केली व जोरदार दगडफेक करण्यात आली. याच दरम्यान गोळीबारदेखील केला गेला. बादल यांच्या गोडीवर तुफान दगडफेक झाली. या घटनेनंतर अकाली दल व काँग्रेस कार्यकर्ते आपसात भिडले. त्यात काहीजण जखमी झाले. अकाली दलाने आरोप केला आहे, की आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करू नये, म्हणून काँग्रेसकडून असे करण्यात आले आहे. यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. अकाली दलाकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला असून, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांच्या नेतृत्वात या घटनेचा तपास केला जावा अशीदेखील मागणी करण्यात आली.
नव्या कृषी कायद्याविरोधात देशभर जनजागृती करणार
नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे स्वरुप दिवसेंदिवस वाढत चालले आहे. भारतीय किसान युनियनने नव्या कृषी कायद्यांसंबंधी देशभरात जागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आपण देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन मोहीम राबवणार असल्याचे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी जाहीर केले. दुसरीकडे शेतकर्यांनी सहा तारखेला देशव्यापी ‘चक्का जाम’ची घोषणा केली आहे. या सर्व घडामोडींदरम्यान टिकैत यांनी शेतकरी आंदोलनासंबंधी एक मोठी घोषणा केली आहे.