बीड/प्रतिनिधी: डिझेल-पेट्रोल पाठोपाठ आता गॅसचे दर वाढले आहेत. या दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्रभर महिला आंदोलन करत आहेत. बीडच्या राष्ट्रवादी...
बीड/प्रतिनिधी: डिझेल-पेट्रोल पाठोपाठ आता गॅसचे दर वाढले आहेत. या दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्रभर महिला आंदोलन करत आहेत. बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला कार्यकर्त्या आज चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेणाच्या गोवर्या घेऊन पोहोचल्या. गॅसची झालेल्या दरवाढीमुळे महिला त्रस्त झाल्या आहेत. घर खर्चाचे बजेट कोलमडत आहे. त्यामुळे पुन्हा आम्हाला पारंपरिक पद्धतीने चूल पेटवावी लागेल. याची आतापासूनच तयारी सुरू केली असल्याचे आंदोलक महिलांनी म्हटले आहे.
या वेळी या आंदोलक महिलांनी जोरदार घोषणा दिल्या. पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात आज ओरड होत असताना महिलादेखील त्याच दरवाढीमुळे हैराण झालेल्या आहेत. उज्वला गॅस योजनेमधून अनेक ठिकाणी गॅस दिला आहे; मात्र त्याच्या किमती वाढल्यामुळे ते घेणे परवडत नसल्याचे महिलांनी सांगितले. त्यामुळे घराघरात जरी गॅस असला, तरी तो भरणे परवडत नसल्यामुळे आता गॅस न वापरता पारंपरिक पद्धतीने चूल पेटवण्याची वेळ महिलावर ओढावली असल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले. मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलसह गॅसचे भाव वाढवले आहेत. गॅसच्या सिलेंडरचा भाव 600 होता, तो आता 725 पर्यंत पोहोचला आहे. मोदी सरकारकडून उज्वला गॅस योजनेचे गाजर दाखवण्यात आले होते. उज्वला योजनेतून महिलांना सिलेंडर दिले आहेत; मात्र त्याचा उपयोग काय? गॅसच्या किंमती वाढलेल्या आहेत. केंद्र सरकारने तात्काळ गॅसचे दर कमी करावेत, अन्यथा महिलांना पुन्हा चुली पेटवाव्या लागतील. काही महिनांनी चूल पेटविण्यास सुरुवात केली आहे. आता गॅससाठी पैसे नसल्याने चूल पेटविण्यासाठी गोवर्यांचा वापर करावा लागणार. त्यामुळे आम्ही या गोवर्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली आहे. या गोवर्या घेऊन सरकारच्या गॅस दरवाढीचा निषेध व्यक्त केला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या हेमा पिंपळे म्हणाल्या.