मुंबई/प्रतिनिधीः काँग्रेस नेते भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मुंबईत काँग्रेस अधिकच आक्रमक झाली आहे. त्यातच केंद...
मुंबई/प्रतिनिधीः काँग्रेस नेते भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मुंबईत काँग्रेस अधिकच आक्रमक झाली आहे. त्यातच केंद्र सरकारने इंधन दरवाढ आणि गॅस दरवाढ करून काँग्रेसच्या हाती आयतेच कोलीत दिल्याने भाईंनी हा मुद्दा हायजॅक करत आज मुंबईत प्रचंड ‘निषेध मोर्चा’ काढला.
या मोर्चाला काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावल्याने काँग्रेस मुंबईत कात टाकत असल्याचे दिसते आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून हे शक्तीप्रदर्शन सुरू असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण या मुंबईत होत्या. दादरच्या योगी सभागृहात त्यांचे भाषण होते. या पार्श्वभूमीवर भाई जगताप यांनी काँग्रेसच्या नेतृत्वात मुंबईत निषेध रॅली काढली. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, चरणजीत सप्रा, नसीम खान आणि सचिन सावंत यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते या रॅलीला उपस्थित होते. दादरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानापासून निघालेल्या या रॅलीत महिलांचा सहभाग सर्वाधिक आहे. सर्वांच्या हातात फलक असून त्यावर काँग्रेसच्या कार्यकाळात 2014मधील गॅस सिलिंडरचे भाव आणि आताचे गॅस सिलिंडरचे भाव लिहिण्यात आले आहेत. या फलकावर 2014मध्ये गॅस सिलिंडर 392 रुपयांना मिळत होता, आता त्याची किंमत 721 रुपये झाल्याचे म्हटले आहे. ‘मोदी सरकार हायहाय’, ‘इंधन दरवाढीचा निषेध असो’, अशा घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. काँग्रेसच्या या मोर्चामुळे दादरमध्ये वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. काँग्रेसने सकाळी साडेनऊ वाजल्यापासूनच मोर्चाला सुरुवात केली. रविवार असतानाही एवढ्या सकाळी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. बघावे तिकडे गर्दीच गर्दी दिसत होती. राजगृहापासून ते रुईया कॉलेज ते स्वामीनारायण मंदिरापर्यंत प्रचंड गर्दी होती. हातात फलक, झेंडे घेत मोर्चेकरी घोषणा देत असल्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. त्यामुळे काँग्रेसने मुंबईत कात टाकायला सुरुवात केल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. भाई जगताप हे कामगार नेते आहेत. लढाऊ आणि आक्रमक नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. काँग्रेसने त्यांची मुंबईच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली, तेव्हापासून जगताप हे आक्रमक झाले आहेत. काँग्रेसची भूमिका आक्रमकपणे मांडण्याचा ते सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मरगळ झटकण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे..