नाशिकः नाशिकचे पालकमंञी तथा राज्याचे अन्न पुरवठा मंञी ना. छगन भुजबळ यांनी ट्विटरद्वारे आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची दिली माहि...
नाशिकः नाशिकचे पालकमंञी तथा राज्याचे अन्न पुरवठा मंञी ना. छगन भुजबळ यांनी ट्विटरद्वारे आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची दिली माहिती असून गेल्या तीन दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकानं काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
राज्यात कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात आली असताना मागील काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्यानं कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा तथा नाशिकचे पालक मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःच ट्विटरद्वारे ही माहिती दिली. गेल्या तीन दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचण्या करून घ्याव्यात असे आवाहनदेखील भुजबळ यांनी केले आहे.
पालकमंत्री भुजबळ गेल्या तीन दिवसांपासून नाशिकच्या दौऱ्यावर असून त्यांनी अनेक बैठकांना हजेरी लावली होती. तसंच रविवारी देवळाली येथील आ. सरोज अहिरे यांच्या विवाह सोहळ्याला त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासह हजेरी लावली होती. त्यानंतर साहित्य महामंडळाच्या बैठकीला देखील ते हजर होते. नाशिकमध्ये येत्या २६ ते २८ मार्च दरम्यान होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावादेखील त्यांनी घेतला होता. तसेच दिवसभरात दोन पञकार परिषदेच्या निमित्ताने माध्यम प्रतिनिधींशी त्यांचा संपर्क आला होता.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिक ठाले पाटील,विश्वस्त जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, राष्ट्रवादीचे खजिनदार हेमंत टकले, यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. इतकेच नव्हे तर सायंकाळी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नाशिकमध्ये आजपासून रात्रीची संचारबंदी जाहीर केली. यामुळे गेल्या दोन दिवसात भुजबळ हे अनेक मान्यवरांच्या आणि नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे संबंधितांनादेखील आता चाचणी करून घ्यावी लागणार आहे.