अन्न व औषध प्रशासनाची कारवाई ः सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त विशाल पाटील (कराड / प्रतिनिधी) ः सातारा जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा, पा...
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई ः सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
विशाल पाटील (कराड / प्रतिनिधी) ः सातारा जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, जर्दा तसेच सुगंधित सुपारीचा विक्री करीता वाहतूक करत असलेल्या तिघांना अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. महेश हणमंत यादव (रा. कुमठे, ता. कोरेगाव, जि. सातारा), सुभाष सदाशिव कोकरे, जितेंद्र गोविंद चिंचकर (दोघेही रा. वसंतगड, ता. कराड) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, जर्दा, तसेच सुगंधित सुपारीचा साठा व प्रतिबंधित अन्न पदार्थाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी महेश यादव हा अॅपे रिक्षामधून सिव्हील रोड, सातारा या परिसरात अवैध रित्या प्रतिबंधित अन्न पदार्थाची विक्री करता वाहतूक करत असताना त्याला अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून 25 हजार 628 रूपयाचा अन्न पदार्थाचा साठा व वाहन असा सुमारे पावणेदोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच वसंतगड येथील सुभाष कोकरे, जितेंद्र चिंचकर हे दोघे अवैध रित्या प्रतिबंधित अन्न पदार्थाची विक्री करता वाहतूक करत असताना अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून 85 हजार 498 रूपयाचा अन्न पदार्थाचा साठा व वाहन असा सुमारे 1 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत वाहन चालकांचा परवाना व वाहनांची नोंदणी रद्द करण्यासाठी संबंधित मोटर परिवहन अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त एस. एस. देसाई, सहाय्यक आयुक्त दि. तु. संगत यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आय. एस. हवालदार, आर. आर. शहा यांनी केली.