पुणे/प्रतिनिधीः सायळी काळे, वय वर्ष 27...पुण्यात राहणारी तरुणी, महामारीच्या काळात नोकरी गेली. वडिलांचे दहा वर्षांपूर्वी निधन झालेले.. घरी आज...
पुणे/प्रतिनिधीः सायळी काळे, वय वर्ष 27...पुण्यात राहणारी तरुणी, महामारीच्या काळात नोकरी गेली. वडिलांचे दहा वर्षांपूर्वी निधन झालेले.. घरी आजारी आई... पैसा कमावण्यासाठी तिने चुकीचा मार्ग निवडला. त्या मार्गाने ती थेट तुरुंगात पोहोचली. डेटिंग अॅपद्वारे तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना लुटणार्या सायलीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर अटक केली. गेल्या आठवड्यात चेन्नईतील तरुणाने पोलिसांत तक्रार केली होती. आशिष कुमार असे त्याचे नाव आहे. डेटिंग अॅपद्वारे ओळख वाढवली. त्यानंतर त्याला पुण्यात बोलावून घेतले. एका हॉटेलमध्ये गेल्यानंतर शीतपेयातून त्याला गुंगीचे औषध दिले होते. त्याच्या अंगावरील दागिने आणि रोकड लुटली होती. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. तिने 16 तरुणांना कसे प्रेमाच्या जाळ्यात ओढले, याची माहिती उघड झाली आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाने ऑनलाइन डेटिंग अॅपवर वेगवेगळ्या नावांनी प्रोफाइल तयार केले. सुरुवातीला या तरुणीने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही. महिलेच्या नावाने पोलिसांनी एक बोगस प्रोफाइल तयार केले आणि त्यावरून तिला रिक्वेस्ट पाठवली. तिने लगेच ती स्वीकारली. तिने तातडीने डेटवर बोलावले. पोलिसांनी वेळ न घालवता तातडीने कारवाई करून तिला अटक केली. एका टेलिकॉम कंपनीत तरुणी नोकरीला होती. तिची नोकरी गेली. टाळेबंदीमुळे तिला नोकरी मिळाली नाही. गेल्या वर्षभरात तिने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 16 तरुणांना लुबाडले. डेटिंग अॅपद्वारे ती ओळख वाढवून तरुणांना पुण्याला बोलवायची. त्यानंतर त्यांना लुटून पसार व्हायची. पोलिसांनी तिच्याकडून 15 लाखांची रोकड जप्त केली आहे. मोबाइल फोन आणि लुटलेले सोनेही हस्तगत केले आहे. सायलीने केवळ परराज्यांतील तरूण-तरुणींना लक्ष्य केले. डेटिंग अॅपवर तिने बनावट प्रोफाइल तयार केले. त्यानंतर ती परराज्यांतील तरुणांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची. त्यांच्याशी ओळख झाल्यानंतर चॅटिंग करायची. त्यांना फोन करून पुण्यात बोलावून घ्यायची. हॉटेल, लॉज आणि फ्लॅटवर बोलावून त्यांना शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन लुटायची. सायलीच्या वडिलांचे 10 वर्षांपूर्वी निधन झाले. तिची आई नैराश्यात आहे. तिच्यासाठी डॉक्टरांनी झोपेच्या गोळ्या दिल्या आहेत. त्याचाच वापर ती या गुन्ह्यासाठी करायची. मेडिकल स्टोअरमध्ये डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी दाखवून ती गोळ्या खरेदी करायची. तरुणांच्या शीतपेयात ती मिसळून त्यांना बेशुद्ध करायची. त्याच्याकडील दागिने आणि रोकड लुटून पसार व्हायची.